नागपूर : राज्य सरकार ड्रग्ज माफियांसमोर लोटांगण घालत आहे. सरकारमधील काही मंत्री यामध्ये सहभागी आहेत, असा आरोप विरोधकांनी सोमवारी केला. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवन परिसरात आंदोलन केले. ‘उडता पंजाबनंतर उडता महाराष्ट्र’, ‘सरकारकडून काय करावी आशा, तरुणांच्या माथी मारली ड्रग्जची नशा’, असे फलक हातात घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारला धारेवर धरले. यावेळी ‘ड्रग्ज माफियांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा निषेध असो’, ‘उडता महाराष्ट्र करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणा देण्यात आल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पुसदच्या पाणी पुरवठा योजनेवरून सत्ताधारी खासदार-आमदारांतच वाद पेटला

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘शेजारी असलेल्या गुजरातमधून दोन हेलिकॉप्टर येतात. त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात ड्रग्जमाफिया कार्यरत आहेत. त्यांना सरकार पाठीशी घालत आहे. महाराष्ट्र तसेच उत्तर प्रदेश सरकारमधील काही मंत्री या माफियांना संरक्षण देताहेत. ललित पाटील या संपूर्ण प्रकरणातील छोटासा प्यादा आहे. वास्वतिक पाहता हे सरकार यासाठी जबाबदार असून त्यांच्याद्वारे ड्रग्ज माफिया सक्रिय आहेत.’ यावेळी आंदोलनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह वर्षा गायकवाड पाटील, रवींद्र धंगेकर, सतेज पाटील आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा : वाशीम : सरपंच, ग्रामसेवक संपावर, ग्रामपंचायती कुलूबपंद; कामकाज ठप्प!

सलीम कुत्ताच्या कार्यक्रमात गिरीश महाजनही जेवले…

मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य आरोपी आणि दाऊद इब्राहिमचा राइट हॅण्ड समजला जाणारा सलिम कुत्ता हा पॅरोलवर असताना नाशिकमध्ये शिवसेनेचे (ठाकरे गट) महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी त्याच्यासोबत पार्टी केल्याचे पुरावे भाजप आमदार नितेश राणे यांनी सभागृहात दिले होते. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली. याच सलीम कुत्ताच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते, असा दावा महाविकास आघाडीने केला आहे. बॉम्बस्फोटातील आरोपीच्या कार्यक्रमात गिरीश महाजन का जेवले, असा प्रश्न आंदोलनादरम्यान करण्यात आला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur opposition leaders protest outside assembly on the issue of drugs mafias mnb 82 css