नागपूर : दिवाळी हा आनंदाचा सण आहे. हा आनंद भेटवस्तूच्या माध्यमातून मित्रांमध्ये वाटण्यासाठी एक ४८ वर्षीय व्यक्ती घरून निघाला. परंतु प्रकृती खालवल्यावर रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मेंदूमृत झाल्याचे पुढे आले. परंतु जगाचा निरोप घेतांना ऐन दिवाळीत त्याने अवयवदानातून पाच कुटुंबात प्रकाशाची पेरणी केली. उदय पराते (वय ४८) (रा. सहकार नगर, जि. नागपूर) असे मेंदूमृत रुग्णाचे नाव आहे. तो एका खासगी कंपनीत शाखा व्यवस्थापक होता.
हेही वाचा : आशा वर्करकडून काळी दिवाळी साजरी; वेतन न झाल्याने रात्रभर आंदोलन
दिवाळीत नातेवाईक आणि मित्र परिवारात भेटवस्तूच्या माध्यमातून आनंद वाटण्यासाठी तो काही दिवसांपूर्वी घरातून निघाला. परंतु अचानक त्याची प्रकृती खालावली. त्याला उपचारासाठी सेंट्रल इंडिया कार्डिओलाॅजी हाॅस्पिटल ॲन्ड रिसर्च इनस्टिट्यूट या खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. रुग्णाच्या मेंदूत रक्तस्त्राव होता. उपचाराला प्रतिसाद नसल्याने त्याच्या विविध तपासणी झाल्या. त्यात रुग्णाचा मेंदूमृत झाल्याचे स्पष्ट झाल्यावर डॉ. सुनील वाशिमकर यांनी नातेवाईकांना अवयवदानाची माहिती देत मेंदूमृत रुग्णाबाबत विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीलाही कळवले.
हेही वाचा : मराठा समाजाबाबत तत्परता; ओबीसींचा सांख्यिकी तपशील गोळा करण्याबाबत सरकारची उदासीनता
नातेवाईकांनी अवयवदानास होकार दर्शवताच रुग्णाला सरस्वती रुग्णालयात हलवले गेले. त्यानंतर रुग्णाच्या अवयवांशी गुणसूत्र जुळणाऱ्या गरजू रुग्णांचा शोध सुरू झाला. दरम्यान शनिवारी (११ नोव्हेंबर) प्रतिक्षा यादीतील एलेक्सिस रुग्णालयातील एका ६२ वर्षीय पुरूष रुग्णाला यकृत, एसएस मल्टिस्पेशालीटी रुग्णालयातील एका ३१ वर्षीय पुरूषाला एक मुत्रपिंड तर दुसरे मुत्रपिंड सावंगी वर्धेतील एव्हीबीआरएच रुग्णालयातील ४९ वर्षीय पुरूषामध्ये प्रत्यारोपीत केले गेले. तर दोन बुब्बुळ महात्मे आय बँकेला दिले गेले असून त्याचे भविष्यात दोन रुग्णांत प्रत्यारोपण होणार आहे. त्यामुळे पराते कुटुंबातील रुग्णाची पत्नी वैशाली, मुलगा पृथ्वीराज, मुलगी श्रिया यांच्यामुळे पाच कुटुंबात ऐन दिवाळीत आनंदाची पेरणी होण्यास मदत होणार आहे.