नागपूर : ग्राम विकास विभागाने सुरू केलेल्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्र या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यभर गावपातळीवर ‘पॅनकार्ड’ पासून तर ‘पासपोर्ट’ काढण्यापर्यंत आणि किसान सन्मान योजनेपासून तर कामगारांच्या नोंदणीपर्यंतच्या सर्व सेवा उपलब्ध झाल्या आहेत. राज्यातील या प्रकल्पाला मिळालेल्या यशामुळे इतर राज्यांतही अशाप्रकारचा प्रकल्प राबवला जात आहे.
‘आपले सरकार सेवा केंद्र’ प्रकल्प हा एक बहुआयामी प्रकल्प असून याद्वारे सर्व पंचायतराज संस्थाचे संगणकीकरण करण्यात आले असून या माध्यमातून जिल्हा मुख्यालयी सरकारी कार्यालयात उपलब्ध असलेल्या विविध सेवा नागरिकांना गावातच उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. केंद्राच्या ‘सिटीझन कनेक्ट ॲप’ वर २०२३-२४ या चालू आर्थिक वर्षात राज्यातील २७,८,६३ ग्रामपंचायतींमध्ये १२ लाख ३१ हजार ६१० नागरिकांनी नोंदणी केली व त्याद्वारे कर भरणा, वीज देयके भरणे व तत्सम स्वरूपाचे २४,०६४ व्यवहार केले. तर २ कोटी १६ लाख ७९,९६५ नागरिकांनी केंद्राच्या इतर सुविधांचा लाभ घेतला. केंद्र सरकारच्या कामगारांच्या योजनांसाठी चालू वर्षात ६२८४० कामगारांनी या केंद्राद्वारे नोंदणी केली. या केंद्रामुळे महाराष्ट्रात २०,५०० केंद्र चालकांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले, असे या प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक विनय पहलाजानी यांनी सांगितले.
हेही वाचा : चंद्रपूर : वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू
सेवा केंद्राद्वारे मिळणाऱ्या सेवा
‘आपले सरकार’ सेवा केंद्राद्वारे पंतप्रधान किसान सन्मान निधी नोंदणी, ई-केवायसी, पंतप्रधान पीक विमा, आयुष्मान भारत, तसेच राज्य शासनाच्या महात्मा फुले कर्जमाफी योजना, अनुदान/ नुकसान भरपाईसाठी ई-केवायसी करणे यासाठी हे केंद्र सर्वसामान्य नागरिकांना सोयीचे ठरते. तसेच ग्राम पंचायतस्तरावर पॅन कार्ड ते पासपोर्ट, बँक खाते काढण्यापासून ते त्यांना बँकेच्या सर्व सुविधा पुरवणे, टीव्ही, मोबाईल रिचार्जपासून ते विमा हप्ता भरणे, गॅस बुकिंगपासून विमान तिकीट बुकिंगपर्यंतची कामेही कामे या केंद्रातून होते. उत्पन्नाचा दाखला, डोमासाईल प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, तसेच ७/१२, ८अ उतारा व तत्सम सेवा या प्रकल्पांतर्गत उपलब्ध होत आहेत.
हेही वाचा : शिवमहापुराण कथेच्या आयोजनामुळे पर्यावरणाला धोका! मानव-वन्यजीव संघर्ष…
“आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्प ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत राबवला जातो. ज्या माध्यमातून गावपातळीवर नागरिकांना एका क्लिकवर विविध सेवा पुरवठा केला जातो. क्युआर कोडद्वारे करसंकलन, डिजिटल ग्रा.पं, महाग्राम ‘ॲप’ तसेच विविध कामांचे ऑनलाईन शोधण ‘ॲप’द्वारे केले जात असल्याने कामात पारदर्शकता आली आहे.” – विनय पहलाजनी, प्रकल्प व्यवस्थापक, विदर्भ