नागपूर: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड याला प्रमुख आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोप पत्रात हत्याकांडाचे काही फोटो देखील सादर करण्यात आले आहेत. या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे व मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी तीव्र झाली होती. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी आज (४ मार्च) सकाळी त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. मंगळवारी नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला आल्या असता पशुसंवर्धन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संतोष देशमुख यांच्यावर हत्येची चित्रफित पाहू शकत नाही. हा अमानुष खून आहे. आरोपींना जात नसते. ते कुठल्याही जातीचे असले तरी त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. मी संतोष देशमुख यांच्या आईची माफी मागते, असे म्हणत पंकजा मुंडेंच्या डोळ्यात पाणी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंकजा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात मला कल्पना नव्हती. आज सकाळी नागपूरला आल्यावर समाज माध्यमांवरून ही माहिती मिळाली. या संपूर्ण घटनेचा तपास सुरू असल्यापासून माझी भूमिका मी स्पष्ट केली आहे. मी सर्वात आधी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणाचा तपास करण्याची विनंती केली होती. चौकशी समितीने दोषारोप पत्र सादर केल्यानंतर समोर आलेले व्हीडीओ पाहण्याची माझ्यात हिंमत नाही. हा अमानवी प्रकार आहे. या संपूर्ण प्रकारावर मी संतोष देशमुखच्या आईची माफी मागते. मी सुद्धा एक आई आहे. त्यामुळे अशा अमानवी घटनांमुळे त्यांच्यावर काय परिणाम झाले असतील हे मी समजू शकते, असे म्हणत पंकजा मुंडेंना अश्रू अनावर झाले. धनंजय मुंडेंनी आधीच राजीनामा दिला असता तर पदाची प्रतिष्ठा राहिली असती. मी त्याची लहान बहीण असून कुठल्याही परिवारासाठी ही दु:खद घटनाच आहे असेही त्या म्हणाल्या.

आरोपींना कठोर शिक्षा व्हायलाच हवी

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर याला जातीय रंग देण्यात आला. परंतु, ज्या आरोपींचे फोटो समोर आलेत ते कुठल्या जाती धर्माचे आहेत हा विषय आता उरला नाही. आरोपींना कुठलीही जात नसते. आम्ही जेव्हा मंत्रीपद किंवा आमदारकीची शपथ घेतो तेव्हा जात धर्म हा विषय आमच्यासाठी संपला असतो. कुणाविषयीही ममत्व भाव आम्हाला ठेवता येत नाही. त्यामुळे आरोपी कुठल्याही जातीचा असतो. त्याला कठोर शासन व्हायला हवे हीच आपली मागणी असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.