नागपूर : कॉलेज, ट्युशनला जातो असे घरी सांगून गेलेली नागपुरातील सहा मुले कॉलेजला न जाता परस्पर मित्र – मैत्रिणींसोबत सहलीला गेली. यापैकी चौघे घरी परतलेच नाही. त्यांचे मृतदेहच आले. ही घटना नागपूरकर पालकांचे मन सुन्न करणारी ठरली आहे. कॉलेजच्या नावाखाली घरून निघणारी मुले नंतर करतात तरी काय? ही चिंता पालकांना सतावत आहे.
नागपूर जिल्ह्यातील वाकी येथे सहलीला गेलेल्या चौघांचा नदीत बुडून मृत्यू झाला. यात एका तरुणीचा समावेश आहे. साधारणपणे अकरावी, बारावीतील ही मुले सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. ‘फ्रेण्डशिप डे’ ला आखलेला सहलीचा बेत फसल्याने सहाजण दोन दुचाकींवरून ट्रिपलसिट बुधवारी वाकीला सहलीला गेले. मात्र याची घरच्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती. सर्वांनी घरी कॉलेजला, ट्युशनला जातो हेच सांगितलं होतं.
हेही वाचा : “ना कबुतर आया, ना फोन…”, ॲड. प्रकाश आंबेडकर असे का म्हणाले?
सध्या स्पर्धा परीक्षांचे युग आहे. नीट, जेईईच्या क्लाससाठी मुले सकाळीच घराबाहेर पडतात व रात्रीच घरी परततात. दिवसभर हे वर्ग चालतात. त्यामुळे पालकांना त्यांची पाल्ये शाळा, कॉलेज, ट्युशनमध्ये असतील असे वाटते. घरी येण्याची निर्धारित वेळ टळल्यावर चौकशी केली जाते. वाकीतील घटनेने या चौकटीलाच धक्का बसला आहे. त्यामुळे पालक चिंतेत आहेत.
हेही वाचा : गोंदिया: ७० हजाराच्या लाचप्रकरणात वडेगावच्या सरपंचासह तिघे एसीबीच्या जाळ्यात
मुलगी बारावीतील असलेल्या माधुरी राऊत म्हणाल्या, अशा प्रकारच्या घटनांनी धक्का तर बसतोच. पण मुलांवर आमचा विश्वास आहे. संस्कारही महत्त्वाचे ठरतात. छत्रपती चौकातील ट्युशन क्लासचे संचालक म्हणाले, विद्यार्थी क्लासला आला नसेल तर आम्ही पालकांना कळवतो.