नागपूर : राष्ट्रीय स्तरावर डिजिटल पेमेंटचे प्रमाण वेगाने वाढत असताना, महामेट्रो नागपूर देखील यात मागे नाही. मेट्रो तिकीटांपासून मिळणाऱ्या एकूण महसूलापैकी सुमारे ५० टक्के हा महाकार्ड, युपीआय पेमेंट्सचे विविध प्रकार आणि नागपूर मेट्रो ॲपपद्वारे प्राप्त होते. प्रवासी भाडयाच्या माध्यमाने मिळणाऱ्या एकूण महसूलापैकी महाकार्डद्वारे दररोज सरासरी ३४ टक्के प्रवासी तिकीट खरेदी करतात. तर युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय) आणि नागपूर मेट्रो ॲपव्दारे १२ टक्के पेक्षा जास्त महसूल प्राप्त होतो. तिकीटपासून मिळणाऱ्या एकूण महसुलापैकी ४६ टक्के महसूल हा डीजीटल माध्यमातून येतो, असे मेट्रोकडून सांगण्यात आले.
हेही वाचा : “…म्हणून विधानसभेच्या पत्रकार गॅलरीतून घोषणा”, पोहरेंनी स्पष्टच सांगितलं
मेट्रो कार्डवर प्रवाशांना तिकिटावर १० टक्के सवलत दिली जाते. प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहावे लागत नाही. ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) च्या माध्यमाने फक्त कार्ड टॅप करून सहज पुढे जाता येते, यामुळे महाकार्डचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा कल भविष्यात देखील कायम राहील आणि ऑनलाइन पद्धतीचा वापर करणाऱ्या प्रवाश्यांच्या संख्येत वाढ होईल, असा विश्वास महामेट्रोने व्यक्त केला आहे. प्रवाशांची गरज लक्षात घेता महामेट्रोने महाकार्डसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाची मदत घेतली आहे.