नागपूर : रस्ते बांधणीसाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर शहरात मात्र पूल, रस्ते बांधणीच्या कामांसाठी बर्डीसारख्या अत्यंत वर्दळीच्या भागातील रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे नागपूरकर कमालीचे त्रस्त आहेत. सीताबर्डी ही नागपूरची प्रमुख बाजारपेठ आहे. दररोज हजारो ग्राहक खरेदीसाठी येथे येतात. या शिवाय येथे शहर बसचे मध्यवर्ती बसस्थानक आणि मेट्रोचे जंक्शनही बर्डीत आहे. त्यामुळे हा परिसर प्रचंड गर्दीचा म्हणून ओळखला जातो. या बर्डीकडे जाणारा कॅनल रोड एक वर्षापासून बंद आहे. येथे एका पुलाचे बांधकाम सुरू आहे.
हेही वाचा : दांडियाच्या सरावात रमली तरुणाई, विविध नृत्य प्रशिक्षकांकडून घेत आहेत रास गरबाचे धडे
आता २३ सप्टेंबरला आलेल्या महापुरात पंचशील चौकातील नाल्यावरील पूल वाहून गेल्याने बर्डीकडे जाणारा रस्ता बंद केला. त्यामुळे बर्डीला जायचे कसे? असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे पंचशील चौकात बंद केलेला रस्ता हा महामार्ग आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. ती आता धंतोली, रामदासपेठ या रहिवासी वस्तीतून वळवण्यात आली. तेथे रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे या भागात सध्या गल्लोगल्ली वाहन कोंडी पाहायला मिळते. नागरिकांनी याबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.