नागपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये १५० कोटींपेक्षा जास्त रकमेचा सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणात काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार कारागृहात बंद होते. बुधवारी दुपारी कारागृहाबाहेर पडताच त्यांच्यावर पुन्हा धंतोली ठाण्यात गुन्हा करण्यात आला. कारागृहातून बाहेर आलेल्या माजी मंत्री सुनील केदार यांनी शक्तिप्रदर्शन करीत वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यासह समर्थकांवर बुधवारी रात्री धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माजी मंत्री सुनील केदारांसह पोलिसांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, रवींद्र चिखले, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुंदा राऊत, जिल्हा परिषदेचे सभापती अवंतिका लेकुरवाळे, अनिल राय, संजय मेश्राम आणि विष्णू कोकड्डे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये १५० कोटींपेक्षा जास्त रकमेचा सरकारी रोखे खरेदी घोटाळा करणारे माजी मंत्री सुनील केदार यांना विविध कडक अटींसह उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला होता. बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास माजी मंत्री सुनील केदार कारागृहातून बाहेर पडले. यानंतर त्यांनी समर्थकांसह शहरात शक्तिप्रदर्शन केले. त्यांची रॅली वर्धा रोड मार्गे रहाटे कॉलनी चौकातून शहीद गोवारी उड्डाणपुलावरून संविधान चौकात पोहोचली. मात्र, या रॅलीमुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला. माजी मंत्री सुनील केदार आणि समर्थकांच्या गाड्यांच्या ताफ्यामुळे उड्डाणपुलावर काही काळ वाहतूक कोंडी झाली.

हेही वाचा : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खरमरीत पत्र; म्हणाले, “घोटाळे रोखण्यासाठी सर्व परीक्षा…”

माजी मंत्री सुनील केदार यांना जामीन मिळताच त्यांच्या समर्थकांना कारागृहासमोर गोळा होण्याचे आवाहन करण्यात आले होते. या संदर्भातील संदेश समाज माध्यमांवर पाहताच धंतोली पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या सभापती अवंतिका लेकुरवाळे आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्या अन्य समर्थकांना सीआरपीसी कलम १४९ अन्वये नोटीस बजावली होती. नागपूर कारागृहात दहशतवादी, नक्षलवादी आणि इतर संवेदनशील गुन्ह्यातील कैदी असल्याने सुरक्षेचे कारण देत पोलिसांनी त्यांना कारागृहासमोर जमण्यास, घोषणाबाजी करण्यास, रॅली काढण्यास मनाई केली होती. असे असतानाही माजी मंत्री सुनील केदार यांचे समर्थक कारागृहासमोर जमले होते. माजी मंत्री सुनील केदार यांच्या सुटकेनंतर कारागृहातून दुपारी दोन वाजता खुल्या गाडीतून रॅली काढण्यात आली. ५० पेक्षा अधिक वाहनांच्या ताफ्यात दाखल झालेल्या माजी मंत्री सुनील केदार यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी रॅली रोखून घोषणाबाजी करत वाहतूक विस्कळीत केली. कारागृहातून संविधान चौकात पोहोचत असताना वर्धा रोडवर सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली होती.

हेही वाचा : दिवसभर मोलमजुरी, सायंकाळी सराव; राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ४० वर्षीय ईश्वरीची कमाल

या पार्श्वभूमीवर धंतोली पोलिसांकडून कलम ३४१, १४३, १८८, मुंबई पोलीस कायदा कलम १३५, मोटार वाहन कायदा कलम १८४, १९४ आणि १७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी मंत्री सुनील केदार यांना सशर्त जामीन मिळाला आहे. त्यांची ही कारवाई नियमांचे उल्लंघन असल्याचे पोलिसांचे मत आहे. धंतोली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे माजी मंत्री सुनील केदार पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur police case registered against former minister sunil kedar after coming out from jail adk 83 css