नागपूर : शहरातील काही पोलीस ठाण्यातील तपास पथके गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा वसुलीवर भर देत आहेत. त्यामुळे ‘गुन्हेगार मोकाट आणि पथके सुसाट’ अशी स्थिती होती. पांढराबोडीतील हत्याकांड तसेच कॅफेचालकाची गोळ्या झाडून झालेली हत्या व कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘प्रॉपर्टी डीलर’चे हत्याकांड घडल्यानंतर पोलीस आयुक्तांनी अंबाझरी व कपिलनगरातील तपास पथके (डीबी) बरखास्त केली. या कारवाईमुळे अन्य पोलीस ठाण्यातील पथकांतील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मागील काही दिवसांपासून नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेला गुंडांकडून खुलेआम आव्हान दिले जात आहे. हत्या सत्रासोबतच गँगवॉरमधूनदेखील बऱ्याच घटना झाल्या आहेत. गोळीबार, हत्याकांड असे प्रकार वाढले होते. अनेक सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यात गुप्तचर यंत्रणा व डीबी पथके अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसून आले. गुन्हेगारांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी डीबी पथकाची मोठी भूमिका ठरते. मात्र, काही डीबी पथके हद्दीतील दारु अड्डे, जुगार अड्डे, गांजा विक्रेते आणि अवैध धंद्यावाल्यांकडून दर महिन्याला वसुली करतात. त्यामुळे गुन्हेगारांचे पोलिसांसोबत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होतात. अंबाझरी व कपिलनगर ठाण्यातील डीबी पथकांच्या निष्क्रियतेमुळे गुंडांची हिंमत वाढली होती. अखेर पोलीस आयुक्तांनी पुढाकार घेत या दोन्ही पोलीस ठाण्यांतील डीबी पथकांना बरखास्त केले. त्यांच्या ठिकाणी नवीन डीबी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेंच्या पथकाकडे दुर्लक्ष
अकार्यक्षम डीबी पथक व अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, गुन्हे शाखेची पथके आजही वसुलीवर भर देत असल्याची माहिती आहे. तसेच पोलीस उपायुक्त कार्यालयातील पथकेसुद्धा अवैध धंदेवाल्यांकडून महिन्याकाठी वसुली करीत असल्याची माहिती समोर आली आहे. डीबी पथकांवर कारवाई करण्यात येत आहे तर गुन्हे शाखा आणि उपायुक्तांच्या पथकांच्या वसुलीकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे.