नागपूर : पोलीस हवालदार असलेल्या युवकाच्या पत्नीचे फेसबुकवरुन बँक अधिकाऱ्याशी सूत जुळले. दोघांचेही प्रेमसंबंध सुरु झाले. परंतु, एका वर्षानंतर दोघांच्या प्रेमसंबंधाची हवालदाराला कुणकुण लागली. हवालदाराने पत्नीच्या प्रियकराला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी कट रचून त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत काडतूस ठेवले. मात्र, हा कट हवालदाराच्याच अंगलट आला. पोलिसांच्या तपासात हवालदाराचे कृत्य समोर आले. त्या हवालदारावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पराज (बदललेले नाव) हा पोलीस दलात हवालदार असून त्याचे उच्चशिक्षित असलेल्या रिता (बदललेले नाव) हिच्याशी लग्न झाले. त्यांच्या संसारवेलीवर दोन फुले उमलली. दोघांचाही संसार सुरळीत सुरु होता. मात्र, हवालदार नेहमी बंदोबस्त, रात्रपाळी आणि दारुच्या व्यसनात राहत होता. दारुच्या नशेत तो पत्नीशी वाद घालून तिला मारहाणसुद्धा करीत होता. त्यामुळे घरात नेहमी वाद होत होते. तो मुलांकडे किंवा त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देत नव्हता. त्यामुळे पती आपल्याला टाळत असल्याचा समज तिला झाला होता. यादरम्यान, एका बँकेत अधिकारी असलेल्या तरुणाशी फेसबुकवरुन रिताची ओळख झाली. दोघांची काही दिवस चॅटिंग सुरु झाली. दोघे काही दिवस संपर्कात आले. एकमेकांशी बोलचाल सुरु असतानाच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांच्या भेटी-गाठी सुरु झाल्या. गेल्या दीड वर्षांपासून दोघांचेही चोरुन-लपून प्रेमसंबंध सुरु होते.

हेही वाचा :शहांच्या वक्तव्याचे विधानसभेत पडसाद

पत्नीचे अनैतिक संबंधाची कुणकुण लागली पतीला

रिता मोबाईलवर वारंवार बोलत होती तसेच ती फेसबुकवर अनेकदा फोटो अपलोड करीत असल्यामुळे पुष्पराजला संशय आला. त्याने पत्नीच्या फोटोला कोण जास्त लाईक्स आणि कमेंट करतो, यावर लक्ष ठेवले. दरम्यान, त्या बँक अधिकाऱ्याचे नाव समोर आले. त्या हवालदाराने मित्राच्या मदतीने बँक अधिकाऱ्याचा पत्ता आणि अन्य माहिती काढली. पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याची खात्री पटल्यानंतर त्याची भेट घेऊन दम दिला. त्याने हवालदाराच्या भीतीपोटी थेट गुजरातला बदली करुन घेतली.

हेही वाचा : मुंबईत बहुमजली अतिसुरक्षित तुरुंग

पत्नीच्या प्रियकराला फसविण्याचा कट

बँक अधिकाऱ्याने गुजरातला बदली केल्यानंतरही पत्नीचे अनैतिक संबंध कायम होते. तो विमानाने प्रवास करुन रिताला भेटायला यायला लागला. त्यामुळे पत्नीच्या प्रियकराला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी कट रचला. दोन काडतूस आणले आणि बँक अधिकाऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीत टाकले. त्यानंतर त्याच्या दुचाकीची पोलिसांना झडती घ्यायला लावली आणि बँक अधिकाऱ्याला फसविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये पुष्पराजच काडतूस ठेवताना दिसला. त्यामुळे गुजरात पोलिसांनी त्या हवालदारावरच गुन्हा दाखल करुन अटक केली. त्या हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे.

Story img Loader