नागपूर : बजाजनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गौरव पराळे आणि राजेश हिवराळे या खंडणीबाज पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यांतर सेवेतून निलंबित करण्यात आले. त्यांला पोलीस खात्यातून लवकरच बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. अपहरण आणि खंडणी मागितल्याच्या प्रकरणातील चवथा आरोपी विक्रांत मेश्राम अद्यापही फरार आहे.

बजाजनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गौरव पराळे आणि राजेश हिवराळे या खंडणीबाज पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या काही मित्रांना गोळा करुन त्यांना तोतया पोलीस बनवले. दोघापैकी एकाच्या घरात पोलीस चौकी तयार केली. त्या पोलीस चौकीत तोतया पोलिसांची भरणा केला. त्या चौकीच्या बळावर शहरात कुठेही बनावट छापे घालून दोघेही लुबाडणूक करीत होते, अशी चर्चा हुडकेश्वर पोलिसांमध्ये आहे. गौरव पराळे आणि राजेश हिवराळे या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या काही मित्रांना तोतया पोलीस बनवले. चौघांपैकी दोघांनी खाकी वर्दीवर मुंबईचे बांधकाम व्यावसायिक अजय वाघमारे यांचे अपहरण केले. त्याला मारहाण करुन खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी देऊन १५ लाखांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास खोट्या गुन्ह्यात अटक करण्याची धमकी दिली. मारहाणीच्या भीतीपोटी वाघमारे यांनी ३ लाख रुपये देण्याचे कबूल केले. मात्र, गौरव आणि राजेश यांना १५ लाख रुपये हवे होते. त्यामुळे त्याला कारमध्येच मारहाण करुन गौरवच्या घरी बनविलेल्या पोलीस चौकीत नेण्यात येणार होते. मात्र, वाघमारे यांनी शिंदे नावाच्या मित्राला खंडणीची रक्कम आणण्यासाठी फोन केला. शिंदेला संशय आल्याने त्याने हुडकेश्वरचे ठाणेदार ज्ञानेश्वर भेदोडकर यांना माहिती दिली. त्यांनी सापळा रचून दोनही पोलीस कर्मचाऱ्यांसह तिघांना अटक केली. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विक्रांत मेश्राम फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. गौरव आणि राजेश यांनी स्वत:ची वर्दी किती जणांना वापरण्यास दिली किंवा आतापर्यंत तोतया पोलिसांची टोळी बनवून किती जणांची लुबाडणूक केली, हा तपासाचा भाग आहे. दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना न्यायालयात पुन्हा हजर करुन पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा : सचिन तेंडुलकर सातव्यांदा ताडोबात; बिजली, छोटी तारा वाघिणीचे दर्शन

गौरव कटाचा मुख्य सूत्रधार

पोलीस कर्मचारी गौरव पराळे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. ज्याचे वडिल पोलीस खात्यात होते. त्यांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्वावर गौरव हा पोलीस विभागात भरती झाला होता. त्याला झटपट पैसे कमवायचे होते. त्यामुळे तो बनावट पोलिसांची टोळी तयार करुन लुबाडणूक करीत होता. तसेच राजेश हिवराळे हा उच्चशिक्षित असून त्याचे भाऊसुद्धा पोलीस खात्यात आहे. गौरवच्या मागे लागून तोसुद्धा खंडणीच्या कटात सहभागी झाला होता.