नागपूर: जो न देखे रवी ते देखे कवी…. अशी एक मराठीत म्हण आहे. असाच एक कवी – लेखक काही तरी जिवंत व वास्तववादी लिहायच्या मोहाने झपाटून नागपूर रेल्वे स्थानकात पोहोचला. फलाट तिकीट काढून एका बाकडयावर जाऊन बसला. रेल्वेतूून चढणारी- उतरणारी माणसे ‘वाचायला’ लागला. त्यांच्या देहबोलीतून काही लिखाणाचा ऐवज सापडतो का ते टिपायला लागला. त्याची ही साहित्य साधना शांतचित्ताने सुरु असतानाच एक आक्रित घडले. हा माणूस इतका का माणसं टिपतोय, अशी शंका तेथे कर्तव्य बजावणाऱ्या एका पोलिसाला आली. त्याने दंडुका सावरत त्या लेखकाला गाठले व सुरू केली न संपणारी प्रश्नांची सरबत्ती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बापुडा लेखक गांगरला. शब्दांशी रोजची सलगी असली तरी पोलिसांच्या तिक्ष्ण प्रश्नांची उत्तरे काही सापडेनात. त्याने शपथेवर सांगितले, तो केवळ लेखक आहे, लिखाणाचा विषय शोधायला स्थानकावर आलाय. पण, पोलीसदादांचा विश्वास काही बसेना. त्यांंनी त्याला उचलले व तडक सीताबर्डी ठाणे गाठले. समोर काळेकुट्ट कारागृह दिसताच लेखक हादरला. त्याने कारागृहातल्या काळया कथा आतापर्यंत केवळ कथा कादंबऱ्यांमध्येच वाचल्या होत्या. पण, येथे तर साक्षात त्याच्या आणि दगडी भिंंतीत केवळ लोखंडाचे काही गजांचेच अंतर उरले होते.

हेही वाचा… स्पर्धा परीक्षा शुल्क वाढीविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी!

अखेर एक शेवटचा प्रयत्न म्हणून त्या लेखकाने एका नेत्याला फोन लावला. त्या नेत्याने पोलिसांना तो कसा मोठा लेेखक आहे, हे पटवून दिले आणि हे लेेखक महोदय पोलिसांच्या कचाटयातून सुटले. ऐरवी हा किस्सा जगजाहीर झाला नसता. पण, परवा नागपुरातील एका साहित्य पुरस्कार वितरण सोहळयात साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी त्या लेखकाची ‘लघुकथा’ भर कार्यक्रमात सांगितली व ती साऱ्यांना कळली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur police detained the writer from the railway station as police found him suspicious smp 79 dvr
Show comments