नागपूर : पोलीस म्हटले की भ्रष्ट, माणुसकी हरवलेला अशी प्रतिमा डोळ्यापुढे येते. मात्र तेसुद्धा माणूस असतात आणि त्यांच्यातसुध्दा माणुसकी दडलेली असते, याचा प्रत्यय नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलिसांच्या कृतीने आला. घरातून निघून आलेल्या, तुटक -तुटक तेलगू भाषा बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि स्वतःची ओळखही नीटपणे न सांगू शकणाऱ्या निराधार ७७ वर्षीय वृध्दाच्या भटकंतीने पोलिसांची झोप उडाली होती.पण पोलिसांच्या माणुसकीच्या वागणुकीने वृध्दाला मदतीचा हात मिळाला आहे.
काटोल तालुक्यातील काटोल कोंढाळी राज्यमार्गावरील पंचधार गावाजवळ ७७ वर्षीय वृद्ध बेवारस स्थितीत फिरत असल्याची माहिती कोंढाळी पोलिसांना मिळाली. त्यांनी वृद्धाला गाठून विचारपूस केली. परंतु तो वृद्ध स्वतःचे नाव, गाव, पत्ता काहीही सांगत नव्हता. तो तुटकी फुटकी तेलुगू बोलत होता, स्वतः विषयीही काही सांगू शकत नव्हता. एकूणच वेडसर स्वरूपाची त्याची वागणूक होती. पण कोंढाळी पोलिसांनी त्याला तसेच सोडले नाही. ठाणेदार पंकज वाघोडे यांनी त्या वृद्ध इसमाची वैद्यकीय तपासणी करून घेतली.
हेही वाचा : चंद्रपूर : ओबीसी आंदोलनाकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष; उपोषणकर्ते टोंगेंची प्रकृती खालावली
त्याच्या नातेवाईकांचा शोध लागेपर्यंत तसेच त्याची ओळख पटेपर्यंत त्याची काळजी घेण्यासाठी बुटीबोरी येथील सात फाऊंडेशन पुनर्जन्म या वृद्धाश्रमात वृध्दाची रवानगी केली. इसमास त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करेपर्यंत सात फाऊंडेशनकडे ठेवले जाईल तसेच त्यांची काळजी घेतली जाईल, असे कोंढाळी ठाणेदार पंकज वाघोडे यांनी सांगितले. पोलिसांमध्येही माणुसकी असल्याचा परिचय ठाणेदार पंकज वाघोडे यांनी करून दिला आहे.