नागपूर : फरार असताना कोरटकरला चंद्रपुरातील चक्क पोलीस मुख्यालयासमोर असलेल्या हॉटेल सिद्धार्थमध्ये मुक्कामी ठेवण्यास आणि त्याला तेलंगणामध्ये पळून जाण्यास मदत करण्याचा आरोप असलेला प्रशिक पडवेकर याच्यासह पाच जणांना कोल्हापूर पोलिसांनी नोटीस बजावली. त्यांचा कोरटकरच्या गुन्ह्यात सहभाग आढळल्यास त्यांना सहआरोपी करण्यात येईल, अशी माहिती कोल्हापूर पोलिसांनी दिली. प्रशिक पडवेकर, धीरज चौधरी (चंद्रपूर), हिफाजत अली, राजेंद्र जोशी (दोघेही रा. इंदूर) आणि साईराज पेंटकर अशी नोटीस बजावलेल्या युवकांची नावे आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा कथित पत्रकार प्रशांत कोरटकर याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो अटक होण्याच्या भीतीने नागपुरातून पळून गेला होता. तो थेट चंद्रपुरातील हॉटेल सिद्धार्थ प्रिमियरमध्ये मुक्कामी होती. यादरम्यान, एका पोलीस अधिकाऱ्याने भेट घेऊन त्याची मदतही केली होती, अशी माहिती आहे. त्यानंतर नागपुरातील प्रशिक पडवेकर, धीरज चौधरी, हिफाजत अली, राजेंद्र जोशी आणि साईराज पेंटकर यांनी त्याला चंद्रपुरात मदत केली. तसेच त्याला तेलंगणामध्ये पळून जाण्यासाठी कारची व्यवस्था करणे, पैसे पुरवणे आणि अन्य मदत केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. त्यामुळे कोरटकरला मदत करणाऱ्या पाचही जणांना कोल्हापूर पोलिसांनी नोटिस पाठवून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे कोल्हापूर पोलीस पाचही जणांना लवकरच चौकशीसाठी बोलावणार आहेत.

नागपुरातून कार जप्त

कोल्हापूर पोलिसांनी नागपुरात छापा घालून कोरटकरची आलिशान कार जप्त केली. तसेच त्याचा मित्र धीरज चौधरी याचीहा कार पोलिसांनी जप्त केली. दोन्ही कार कोरटकरने लपून राहण्यासाठी वापरल्या होत्या. दोन्ही कारचा जप्तीचा पंचनामा करुन सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. तसेच एका पोलीस अधिकाऱ्याच्याही खासगी कारचा वापर कोरटकरने केल्याची चर्चा असून त्या पोलीस अधिकाऱ्याचीही या प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तो पोलीस अधिकारी हॉटेलमध्ये नेहमी कोरटकरच्या सेवेत हजर राहत होता. त्यामुळे त्या पोलीस अधिकाऱ्याला कोरटकरने बदली आणि चौकशीच्या फेऱ्यातून वाचविण्याचे आमिष दिल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

काय आहे नेमके प्रकरण

कोल्हापुरातील रहिवाशी इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी नुकतेच ‘छावा’ चित्रपटावर आपली भूमिका मांडली होती. त्यांनी ब्राह्मण समाजाचा द्वेष केल्याचा आरोप करीत तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याने फोन करून थेट धमकी दिली. याबाबत सावंत यांनी फोनवरुन झालेला संवाद फेसबुकवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ‘जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा,’ असे म्हणत प्रशांत कोरटकरने सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि घरात येऊन मारण्याची दिली धमकी दिली आहे. तसेच कोरटकर याने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले, या प्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.