नागपूर : पत्नीचे कुणाशीतरी अनैतिक संबंध आहेत, अशा संशयाचे भूत मानगुटीवर बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी गिट्टीखदान, पोलीस वसाहतीत उघडकीस आली. विजय चवरे (३८) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मुलाचे छत्र हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विजय हा मुळचा चंद्रपूरचा असून त्याला पत्नी रेणुका, एक दहा वर्षाचा मुलगा व आठ वर्षांची मुलगी आहे. मागील वर्षभऱ्यापासून तो हिंगणा पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्याची पत्नी रेणुका (३६) ही कोराडी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई या पदावर आहे. विजय हा दारू पिण्याच्या सवयीचा होता. दारूच्या नशेत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणावरून त्यांच्यात नेहमीच वाद व्हायचा. शनिवारी तो सकाळी कर्तव्यावर गेला. नंतर दुपारी घरी परतला. मात्र, त्याला पत्नी घरी दिसली नाही. त्याने फोन करून विचारले असता बाजारात गेली असून अर्ध्या तासात परत येत असल्याचे तिने विजयला सांगितले. यावरुन विजयच्या मनात संशय बळावला, ‘मी जेव्हा जेव्हा घरी येतो, तू बाहेरच असते’ असे म्हणून विजयने फोन ठेवला. काही वेळानंतर रेणुका घरी परतली तेव्हा विजय घरी नव्हता.
हेही वाचा : विदर्भात रेल्वे डब्बे निर्मिती प्रकल्पांसह अधिक रेल्वे सुविधांचा प्रस्ताव
रेणुका मुलांसोबत सायंकाळी जेवन करुन खाली फिरण्यास गेली होती. दरम्यान ७ वाजताच्या सुमारास विजय घरी परतला. त्याने पत्नी रेणुकाला फोन करून घरी येण्यास सांगितले. ‘मी घरी येत नाही, तुम्ही नेहमीच दारू पिऊन भांडण करता,’ असे म्हणत तिने फोन ठेवला. परंतू, काही वेळानंतर ती घरी गेली. मात्र, विजयने आतून दार बंद केला होता. विजयने दार उघडले नाही. पर्याय नसल्याने मायलेकांनी घरासमोर ठेवलेल्या त्यांच्याच कारमध्ये संपूर्ण रात्र काढली. या प्रकरणी गिट्टीखदाना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
हेही वाचा : नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
विजयने घेतला टोकाचा निर्णय
विजयचा राग शांत झाला असावा म्हणून रविवारी सकाळी पत्नी रेणूका दार उघडायला गेली. मात्र, दार आतून बंदच होते. तिने दार ठोठावले, परंतू काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आवाज दिला तसेच फोनवरही संपर्क साधला. बराच वेळ होऊनही काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने तिने पोलिसांना माहिती दिली. दार तोडून पोलीस आत घुसले असता विजय हा दोरी सिलींग फॅनला बांधून गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. त्याला तत्काळ रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर तर विजयचे पार्थिव त्याच्या मूळ गावी म्हणजे चंद्रपूरला रवाना करण्यात आले.