अमरावती : आग लागलेल्या सदनिकेमध्ये स्वतःला झोकून देत सिलिंडर बाहेर काढून येथील जय अंबा अपार्टमेंटमधील ७० कुटुंबांचे रक्षण करणाऱ्या करिना थापाच्या अतुल्य धाडसाची दखल घेत केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी तिची निवड केली आहे. येत्या २६ डिसेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते तिला या मानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. धुरांचे लोट, गरम टाईल्स आणि श्वास गुदमरवणाऱ्या स्थितीचा यशस्वी सामना करून आपले अपार्टमेंट आगीपासून वाचविण्याच्या ध्येयाने स्वत:च्या जिवाची पर्वा न करणाऱ्या १७ वर्षीय करिना थापाचे सर्वत्र कौतुक होत आहे. समयसूचकता व धाडसाच्या बळावर तिने सिलिंडरचा स्फोट थांबवला आणि संभाव्य भीषण अपघातातून अपार्टमेंटचे रक्षण केले.
शिखांचे दहावे गुरू गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र साहिबजादा जोरावरसिंह आणि साहिबजादा फतेहसिंह यांनी देशासाठी दिलेल्या प्राणांच्या आहुतीचे स्मरण म्हणून २६ डिसेंबर रोजी देशात ‘वीर बाल दिवस’ साजरा केला जातो. याच औचित्याने केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येतात. शौर्य, क्रीडा, समाजसेवा, विज्ञान- तंत्रज्ञान, पर्यावरण, कला व संस्कृती आणि संशोधन क्षेत्रामध्ये कतृत्वाची छाप सोडणाऱ्या भारतातील मुला-मुलींची विविध निकषांच्या आधारे निवड केली जाते. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात येते. पदक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हेही वाचा : संजय राऊत यांच्या घराची रेकी, आदित्य ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट
कठोरा परिसरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल शेजारील जय अंबा अपार्टमेंटमध्ये १५ मे २०२४ च्या सायंकाळी ६ वाजता ही दुर्घटना घडली होती. अपार्टमेंटच्या ‘बी-विंग’ मधील दुसऱ्या माळ्यावरील सदनिकेमधून धूर निघत असल्याचे दिसताच घरकाम करणाऱ्या करिना थापाने बंद असलेल्या शेजारच्या सदनिकेचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मात्र, आग आणि धुराचे लोट येत असतानाही पाण्याच्या सतत मारा करत तिने सिलिंडर शेजारील आग विझवून ते बाहेर काढले. अशात स्फोट कधीही होऊ शकला असता. करिनाच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला व अपार्टमेंटचे रक्षण झाले. या सर्व घटनाक्रमात धाडस व समयसूचकता दाखविणाऱ्या करिनाच्या या अनन्यसाधारण कार्याची दखल घेत जिल्हा महिला व बाल विकास विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाला पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविला