नागपूर : प्रशांत कोरटकर याच्याकडे असलेल्या रोल्स रॉईस या कारचे गुढ उलगडले. तब्बल ८ कोटी रुपयांची ही कार पिंपरी चिंचवडचे बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांच्या फार्म हाऊसवर मिळाली. ती कार कोल्हापूर पोलिसांनी जप्त केली आहे. ही कार ठकबाज आरोपी महेश मोतेवार याच्या कंपनीच्या नावावर असून ती कार कलाटे याने बँकेच्या माध्यमातून विकत घेतल्याचा दावा करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत कोरटकरने रोल्स रॉईस कारसोबत काही फोटो आणि रिल्स सोशल मीडियावर पोस्ट केले होते.त्यामुळे ती कार कोरटकरची असल्याचे दिसत होते. एका रिल्समध्ये प्रशांत कोरटकर ही गाडी चालवताना देखील दिसला. एका महिन्यापासून या गाडीचा देखील शोध घेतला जात होता. शेवटी ही गाडी पिंपरी चिंचवडचे बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांच्या फार्म हाऊसवर मिळाली. या गाडीबद्दल एक वेगळाच दावा करण्यात आला. या गाडीचा मी मालक आहे असे तुषार कलाटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले.
ही गाडी प्रशांत कोरटकरची नसून ही माझ्या मालकीची आहे. तीन ते चार महिन्यांपूर्वी माझ्या एका मित्रासोबत प्रशांत कोटरटकरची भेट झाली. त्यावेळी त्याने ही गाडी चालवण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यावेळीच त्याने हे रिल्स आणि फोटो काढले. तासभर गाडी चालवू देण्यासाठी त्याने मला विनंती केली. तुषार कलाटे यांनी म्हटले की, मी कोणत्याही चाैकशीला जाण्यास तयार आहे. ही गाडी मी २०१६ मध्ये घेतली. याबद्दल माझी यापूर्वी सीआयडीकडून चाैकशी झाली आहे. माझ्याकडे याबद्दलचे सर्व पुरावे आहेत, असेही कलाटे यांनी सांगितले. कोट्यवधीची फसवणूक करणारा महेश मोतेवार याच्या कंपनीच्या नावावर ही गाडी आहे, याबद्दल मला आताच माहिती कळालीये. मी ही गाडी बँकेकडून घेतलीये. सीआयडीमध्ये केस सुरू असल्याने ही गाडी माझ्या नावावर अजून झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रशांत कोरटकर याच्याशी माझे कोणतेही संबंध नाहीत, असेही कलाटे म्हणाले. सध्या ती कार कोल्हापूर पोलिसांनी जप्त केली असून त्याबाबत सीबीआय आणि कोल्हापूर पोलिसांमध्ये पत्रव्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. पोलिसांकडून प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट देखील जप्त करण्यात आला. शेवटी पोलिसांनी कोरटकरला अटक केली. प्रशांत कोरटकर हा सध्या पोलिस कोठडीत आहे.