नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सात प्राध्यापकांची आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपी असलेले जनसंवाद विभागाचे प्राध्यापक डॉ. धर्मेश धवनकर यांचा चौकशी अहवाल विद्यापीठाला सादर करण्यात आला असून त्यांच्यावर कठोर कारवाईची शिफारस करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे विद्यापीठ लवकरच धवनकरांच्या निलंबनाची कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
सात उच्चपदस्थ विभागप्रमुखांना लैंगिक छळाच्या बनावट तक्रारीची भीती दाखवून लाखो रुपयांची खंडणी वसूल केल्याचा आरोप असलेल्या डॉ. धवनकर यांच्या पराक्रमाने संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राला हादरवून सोडले होते. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीश अजय चाफले यांच्या समितीने त्यांचा अहवाल दिवंगत कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना सोपवला होता. प्राथमिक चौकशी समितीने धवनकर यांची विभागीय चौकशी करावी, अशी शिफारसही केली. त्यामुळे निवृत्त जिल्हा न्यायाधीश समीर दास यांच्या समितीने चौकशी केली. मात्र, ज्या चार प्राध्यापकांनी तक्रार केली होती त्यांनीच सहमतीने माघार घेतली. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले. प्राध्यापकांनी तक्रार मागे घेतली तरी पहिल्या चौकशी समितीसमोर त्यांनी त्यांचा जबाब नोंदवला होता. त्याआधारे डॉ. धवनकर यांच्यावर कारवाई होणार असल्याचे कळते.
समीर दास यांच्या चौकशी समितीने अहवाल विद्यापीठाला सादर केला आहे. त्यात कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे धवनकर यांना आता कायदेशीर नोटीस बजावून त्यांच्यावर लवकरच निलंबनाची कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कायदेशीर चौकशीचे प्रकरण आहे. त्यामुळे सध्या यावर काहीही प्रतिक्रिया देता येणार नाही.
डॉ. प्रशांत बोकारे, प्रभारी कुलगुरू.