नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सोमवारी झालेल्या अधिसभेच्या बैठकीमध्ये सदस्य डॉ. योगेश भुते यांनी राममंदिर बांधकाम पूर्ण झाल्यानिमित्त रामजन्मभूमी न्यासच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवल्याचे विषयपत्रिकेवरून समोर आले आहे. विद्येच्या मंदिरात ‘रामजन्मभूमी’च्या अभिनंदनाचा प्रस्ताव आल्याने शैक्षणिक वर्तुळात हा चर्चेचा विषय झाला आहे. नागपूर विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी मागील अधिसभेच्या कार्यवृत्तावर चर्चा करण्यात आली. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचा ६०५ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. कार्यक्रमाच्या विषयपत्रिकेमध्ये अधिसभा सदस्य डॉ. योगश भुते यांनी ‘रामजन्मभूमी न्यास’च्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला.
प्रस्तावानुसार भारतीय अस्मितेचे प्रतीक असलेले राममंदिराचे बांधकाम पूर्ण होऊन प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला करण्यात आली आहे. याकरिता रामजन्मभूमी न्यासचे अभिनंदन करावे असे म्हटले आहे. डॉ. भुते यांच्या प्रस्तावावर शैक्षणिक वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. डॉ. भुतेंच्या भावनांचा सन्मान केला तरी विद्यापीठ हे असे प्रस्ताव मांडण्याचे ठिकाण नाही, अशी टीका केली जात आहे. विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर मागील काही वर्षात भाजप परिवारातील भारतीय जनता युवा मोर्चा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि शिक्षण मंचाचे वर्चस्व आहे. त्यामुळे विद्यापीठामध्ये उजव्या विचाराचे कार्यक्रम राबवले जात असल्याचा आरोप नेहमीच होतो.
नुकत्याच झालेल्या भाजयुमोच्या नमो युवा महासंमेलनाला विद्यापीठाने जागा दिल्याने विद्यार्थी संघटनांनी विरोध केला. या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्यांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. त्यानंतर आता अधिसभेच्या बैठकीत ‘रामजन्मभूमी न्यास’चा अभिनंदन करण्याचा प्रस्ताव आल्याने पुन्हा टीका होत आहे. सोमवारची बैठक अर्थसंकल्पाच्या मंजुरीनंतर स्थगित करण्यात आली असून पुढील बैठक आता २२ मार्चला होणार आहे. यावेळी हा प्रस्ताव चर्चेला येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Video: वाघिणीला तहान लागली; मग तिने असे काही केले की…
डॉ. भुते यांचा बोलण्यास नकार
या प्रस्तावासंदर्भात डॉ. योगेश भुते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर तूर्तास बोलण्यास नकार दिला. पुढे होणाऱ्या बैठकीमध्ये प्रस्ताव चर्चेला आल्यावर या विषयावर बोलेल, असे ते म्हणाले.
सदस्यांनी कुठला विषय मांडावा हा त्यांचा अधिकार आहे. प्रत्येकाच्या धार्मिक भावनांचा आदर आहे. मात्र, विद्यापीठ आणि ‘रामजन्मभूमी न्यास’ यांचा काहीही संबंध नसताना शैक्षणिक क्षेत्रात असे विषय चर्चेला आणल्यामुळे अनेक शंका उपस्थित होतात. अशा प्रस्तावामधून शैक्षणिक क्षेत्राच्या भगवीकरणाचा जो आरोप होतोय तो खरा असल्याचा वास येतो. विद्यार्थीकेंद्रित योजना आणि ‘रामजन्मभूमी न्यास’चा काहीही संबंध नाही.
अतुल खोब्रागडे, प्रमुख युवा ग्रॅज्युएट फोरम.