नागपूर : देशातील सर्व विद्यापीठाचे कुलगुरू अपात्र आहेत. यांना काहीच येत नाही. केवळ एका विशिष्ट विचारधारेच्या संघटनेचे म्हणून यांची निवड झाली आहे. हे फक्त त्यांच्या विचाराचे पाईक असल्याने त्यांची निवड झाल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्मभूमित काँग्रेसचा स्थापना दिवस साजरा होत असल्याचा आनंद आहे. डॉ. आंबेडकरांनी देशाला संविधान दिले. परंतु हे संविधान काही मंडळी मानत नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळात देशात ब्रिटिशांची जुलुमी राजवट होती. सुमारे पाचशे राजांची सत्ता होती. सामान्य जनतेला मात्र कोणतेही अधिकार नव्हते. काँग्रेसने हे अधिकार सामान्यांना मिळवून दिले.

हेही वाचा : “…तेव्हापासून नरेंद्र मोदींचं भाषण बदललं”, राहुल गांधींचा टोला; म्हणाले, “आधी ते स्वत:ला…!”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, देशातील अनेक विद्यापीठांमध्ये असे कुलगुरू नेमण्यात आले आहेत ज्यांना काहीच येत नाही. केवळ एका विचारधारेशी संबंधित असल्याने त्यांना नेमणूक देण्यात येत आहे. अग्निवीर योजनेमुळे सैन्यदलात निवड झालेल्या दीड लाख लोकांना नोकरी नाकारण्यात आली. यातील अनेक युवक आपल्याला भेटले. त्यावेळी त्यांनी हा प्रकार कथन केला, असा दावाही राहुल यांनी केला.