नागपूर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर तत्परता दाखवली. त्याचप्रमाणे नागपुरातील कथित पत्रकार प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणीसुद्धा तेवढीच तत्परता दाखवावी. कोरटकरवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सकल मराठा महासंघाच्यावतीने राजे मुधोजी भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन केली आहे.
राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करीत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अश्लील शिवीगाळ करणारा कथित पत्रकार प्रशांत कोरटकर अद्याप फरार आहे. “जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा,“ असे म्हणत या कोरटकर यांनी सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि घरात येऊन मारण्याची दिली धमकी दिली आहे. तसेच कोरटकर याने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले, या प्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अधिवेशनातील भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांना मुजरा करुन करतात.
कोरटकर याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासुद्धा नावाचा गैरवापर केला आहे. त्यामुळे कोरटकरसारखी विकृतीला धडा शिकवणे गरजेचे आहे. कोरटकरने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन संपूर्ण महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण होऊन दंगली भडकविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. त्यामुळे त्याला त्वरित अटक करण्यात यावी. नागपूर, जालना व इतर ठिकाणी दाखल गुन्ह्यात जामीन मिळू नये अशी व्यवस्था करावी. कोल्हापूर पोलिसांनी न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडावी. कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. कोरटकरला फरार होण्यास मदत करणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच त्याची संपत्ती सरकार जमा करावी. या गंभीर प्रकरणात कोरटकरवर कारवाई होण्यासाठी सरकार, पोलीस प्रशासन व अन्य विभागाची भूमिका सकारात्मक असावी, असे निवेदन राजे मुधोजी भोसले यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यालयात पाठवले आहे.
पोलिसांच्या भूमिकेवर संशय
गृहमंत्रालय आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या गर्दीत वावरणारा प्रशांत कोरटकर अजुनही फरार आहे. मात्र, त्याचे मोबाईल आणि सीमकार्ड जप्त करण्याच्या सूचना मिळताच कोरटकर हा स्वत:चा मोबाईल आणि सीमकार्ड पत्नी पल्लवी कोरटकरच्या माध्यमातून पोलीस ठाण्यात पोहचून देतो, याबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. कोरटकर हा नागपुरातच असल्याचा स्पष्ट असून त्याला अटक करण्याची हिम्मत पोलीस करीत नसल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.