नागपूर: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वारंवार स्वत:च्या पक्षाची भूमिका व झेंडे बदलू नये, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. प्रेस क्लबमध्ये शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी रामदास आठवलेंसारखा मंत्री होण्यापेक्षा माझा पक्ष बंद करेल, असे वक्तव्य केले होते. त्यावर पत्रकारांनी राज ठाकरेंना महायुतीत घेणार का, असा प्रश्न आठवलेंना विचारला. त्यावर आठवले म्हणाले, राज ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडा आधी निळा, भगवा, हिरव्या रंगाचा होता. त्यानंतर तो भगवा झाला. राज ठाकरे यांचे विचारही सातत्याने बदलताना दिसतात.

राज ठाकरे सध्या महायुतीत नाहीत. ते स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. जास्त जागा जिंकण्याची त्यांच्या पक्षाची क्षमता नाही. त्यांनी निवडणुकीनंतर महायुतीत येण्याची इच्छा व्यक्त केल्यास माझ्यासह देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे सगळे महायुतीतील नेते एकत्र बसून त्याबाबत निर्णय घेऊ. मी महायुतीतील एक पक्ष असून मला एकटयाला राज ठाकरेंबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही. माझा पक्ष लहान असून मी तो देशभरात वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला परराज्यात चांगला प्रतिसाद आहे. राज ठाकरे यांनीही स्वत:चा पक्ष बंद करण्याची भाषा बोलण्यापेक्षा स्वत:चा पक्ष वाढवावा, असेही आठवले यांनी सांगितले.

हेही वाचा : स्वेटर, शॉल शोधलीत का…? कारण, उद्यापासून हुडहुडी…

प्रकाश आंबेडकरांनी वेगळे लढून फायदा नाही

रिपब्लिकन पक्ष एकटा सत्तेवर येऊ शकत नसल्याचे वास्तव आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनीही वेगळे लढण्याचा प्रयोग करून बघितला. त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे आंबेडकर यांनी वेगळे लढून फायदा नाही. निवडणुकीपूर्वी आंबेडकर महायुतीसोबत आले असते तर त्यांनाही मोठा लाभ झाला असता. पुढे त्यांनी महायुतीत येण्याची इच्छा व्यक्त केल्यास मी फडणवीस, शिंदे, पवारांशी चर्चा करेल. त्यानंतर सगळे मिळून त्याबाबत निर्णय घेऊ, असेही आठवले म्हणाले.