नागपूर : वाडीतील बियर बार मालकाने बलात्कार केल्याच्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर न्यायालयात गोंधळ घालणारी उच्चशिक्षित युवती अचानक घरातून बेपत्ता झाली. युवतीच्या आईच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, युवतीच्या बेपत्ता होण्यामागे आरोपी किंवा कुणाचा हात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या सर्व प्रकरणात संशयास्पद भूमिका असलेल्या नगरसेविकेचे मात्र धाबे दणाणल्याची चर्चा आहे. पोलिसांनीही लगेच विविध पथके तयार करुन बेपत्ता युवतीचा शोध सुरु केला.
बुधवारी २३ वर्षीय पिडित उच्चशिक्षित तरुणीने बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन मिळाल्याचा गैरसमज करुन घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात गोंधळ घातला होता. दरम्यान सदर पोलिसांनी लगेच धाव घेत तिला ताब्यात घेतले होते. तिला सूचनापत्र देऊन कुटुंबीयांच्या ताब्यात दिले होते. मात्र बुधवारी रात्रीच्या सुमारास अचानक ती घरुन बेपत्ता झाली. घरच्यांनी रात्रभर तिचा शोध घेतला. परंतु ती कुठेच आढळून न आल्याने शेवटी गुरुवारी त्यांनी वाडी पोलिस स्टेशन गाठून हरविल्याची तक्रार नोंदविली.
हेही वाचा…माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांची भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
या तक्रारीनंतर पोलीस यंत्रणेत प्रचंड खळबळ उडाली. तिने मोबाईल फोन घरीच सोडल्याने पोलिसांना शोध घेण्यात अडचणी येत असल्याचे म्हंटल्या जाते. प्राप्त माहितीनुसार, पिडीता ही बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यापासून तणावात आहे. यापूर्वी फिनाईल पिऊन तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्नसुद्धा केला आहे. दुसरीकडे, आरोपींनी तिला २ लाखाचा धनादेश देऊन तक्रार परत घेण्यासाठी दबाव टाकल्याचा तरुणीचा आरोप आहे. तरुणीने वाडी व एमआयडीसी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करीत आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता.
हेही वाचा…‘समृद्धी’वर मालवाहू वाहनांची धडक; चालक जागीच ठार, तिघे गंभीर
अशाच गैरसमजातून बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात तिने गोंधळ घातला होता. युवती अचानक बेपत्ता झाल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. आरोपींनी युवतीला धमकी दिला का?, तिचे अपहरण झाले का? तिच्यासोबत घातपात केला का? अशी अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. मात्र, वाडी पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून युवतीचा शोध घेणे सुरु केले आहे.