नागपूर: नागपुरातील एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटरच्या निवासी डॉक्टरांकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या धर्तीवर विद्यावेतनाची मागणी केली जात आहे. परंतु प्रशासन ते देत नसल्याने विद्यार्थी संतापले असून त्यांनी शुक्रवारी सकाळपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आणि राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने राज्यातील सर्वच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना निवासी डॉक्टरांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांप्रमाणे विद्यावेतन देण्याची सूचना केली आहे. निवासी डॉक्टरांकडून शिक्षणादरम्यान केल्या जाणाऱ्या सेवेचा तो मोबदला आहे. त्यानंतरही नागपुरातील एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना शासकीय महाविद्यालया एवढे विद्यावेतन दिले जात नाही.
हेही वाचा : राहुल गांधी यांची ओबीसींवर टीका, बावनकुळे म्हणाले “…तर काँग्रेस संपून जाईल”
दरम्यान येथील विद्यार्थ्यांकडून सातत्याने ही मागणी करत वेळोवेळी महाविद्यालय प्रशासनाला निवेदने देण्यात आली. परंतु प्रत्येक वेळेला प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे या महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी शुक्रवारी पहाटे एकत्र येत कामबंद आंदोलन केले. सोबत येथे महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात निदर्शनेही सुरू करण्यात आली. याप्रसंगी प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालयात दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनएवढे विद्यावेतन न मिळाल्यास कामबंद कायम ठेवण्याचा इशाराही दिला गेला. दरम्यान प्रशासनाकडून संपावर जाण्याच्या पूर्वीपासून येथील निवासी डॉक्टरांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या विषयावर एनकेपी साळवे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. काजल मित्रा यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
हेही वाचा : बुलढाणा : अवकाळी पावसाचा आंब्याच्या मोहोराला फटका; वीज पडून एकाचा मृत्यू
चारशेच्या जवळपास विद्यार्थी
नागपुरातील एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट या खासगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विविध विषयांचे सुमारे १२५ ते १५० विद्यार्थी पदव्यूत्तरचे शिक्षण घेत असतात. त्यामुळे तीन वर्षांतील विद्यार्थ्यांची संख्या पकडली तर सुमारे ४०० विद्यार्थी कामबंद आंदोलनात सहभागी असल्याचे आंदोलक विद्यार्थ्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले.