नागपूर : भारतीय जनता पक्ष इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळा असल्याचा दावा रोज यापक्षाचे वरिष्ठ नेते करीत असले तरी तो किती थोतांड आहे, याचा प्रत्यय बुधवारी नागपूर जिल्ह्यात आयोजित भाजपच्या महिला मेळाव्याच्यानिमित्ताने आला. या कार्यक्रमासाठी महिलांची गर्दी व्हावी म्हणून नागपूर जिल्हा परिषदेची यंत्रणा कामाला लावण्यात आली. पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंच, सचिवांना पत्र पाठवून प्रत्येकी १०० महिलांची उपस्थिचे नियोजन करावे, अशा सूचना दिल्या. विश्वसनीयसुत्रांनी ही माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय जनता पक्षाने ‘गाव चलो अभियान’ सुरू केले आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी जिल्ह्यातील काटोल मतदारसंघातील पारडशिंगा या गावाला भेट देणार असून नागरिकांशी संवाद साधणार आहे. हा संपूर्णपणे भाजपचा कार्यक्रम असल्याने पक्षाने यानिमित्ताने बुधवारी ३ वाजता पारडशिंगा येथे महिला मेळावा ( नारी शक्ती वंदन ) आयोजित केला आहे. या कार्क्रमाला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, या भागाचे माजी आमदार आशीष देशमुख यांच्यासह अन्य प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे. या मेळाव्याला गर्दी व्हावी म्हणून नागपूर जिल्हा परिषदेची प्रशासकीय यंत्रणा राबत असल्याची माहिती आहे.

हेही वाचा : VIDEO : थंड वाऱ्याची झुळूक आणि ताडोबात वाघांची मस्ती

काटोल पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी तालुक्यातील सरपंच, सचिवांना पत्र पाठवून या मेळाव्यासाठी १०० महिलांना पाठवण्याची सूचना दिली आहे. या महिलांचा ने-आण करण्याचा खर्च ग्रा.प.च्या स्वनिधीमधील दहा टक्के महिला व बालकल्याणसाठी ठेवलेल्या निधीतून करावा असे या पत्रात नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे भाजप कितीही काही म्हणत असला तरी पक्षाच्या कार्यक्रमासाठी सरकारी यंत्रणा राबवण्यात तेही मागे नाही हे स्पष्ट होते. दरम्यान काटोल पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांशी मोबाईलव्दारे संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur responsibility to gather crowd for bjp s woman meeting is on government departments cwb 76 css