नागपूर : न्यायालयात साक्ष देण्यापूर्वी साक्षीदाराला खरे बोलणार हे सांगण्यासाठी शपथ घ्यायला सांगितले जाते. कुणी यासाठी धार्मिक ग्रंथाची तर कुणी देवाची शपथ घेतो. मात्र नागपूरमधील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने न्यायालयात साक्ष देण्यासाठी भारतीय संविधानाची शपथ घेतली. नागपूरमधील उत्पादन शुल्क विभागातून वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावरून निवृत्त झालेले सुधीर भगत यांनी न्यायालयात संविधानाची शपथ घेतली.
विपीन रवींद्र मदान यांनी ॲड.माणिकराव सावंग यांची मानहानी केल्याप्रकरणी विशेष गुन्हे विभागातील न्यायालयात सुनावणी सुरू होती. या प्रकरणात निवृत्त अधिकारी सुधीर भगत आणि एका इतर अधिकाऱ्याची साक्ष होती. दुसऱ्या अधिकाऱ्याने देवाचे नाव घेत न्यायालयात साक्ष दिली. सुधीर भगत यांना साक्ष देण्यासाठी बोलावल्यावर त्यांनी भारतीय संविधानाची शपथ घेणार असे सांगितले. ‘मी संविधानाची शपथ घेतो, जे बोलेन ते खरे बोलेन…’ असे भगत म्हणाले.
हेही वाचा : कैद्याने उच्च न्यायालयात केली ‘हृदया’च्या आजाराची तक्रार, न्यायालयाने कारागृह प्रशासनाला…
भगत यांनी यापूर्वीही एका प्रकरणात संविधानाची शपथ घेत साक्ष दिली आहे. २०१२ साली राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक पदावर कार्यरत असताना भगत यांनी ही शपथ घेतली होती. ‘संविधानानुसार देशाचे न्यायालय कार्य करते. मात्र तेथे धार्मिक ग्रंथ किंवा देवांच्या नावाने शपथ घेण्यात येते. धार्मिक आस्था ही वैयक्तिक बाब असली तरी न्यायालयात संविधानाची शपथ घेऊन साक्ष दिल्यास त्याला अधिक बळ प्राप्त होईल. देशात संविधान सर्वोच्च आहे. त्यामुळे संविधानाची शपथ घेणे न्यायालयाचा खऱ्या अर्थाने सन्मान करणे होय’, अशी प्रतिक्रिया सुधीर भगत यांनी दिली.