नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्यात कचरा- प्लास्टिकपासून रस्ता निर्मिती केली गेली. कळमेश्वर तालूक्यातील सेलू-कळम येथील प्रकल्पाबाबत आपण जाणून घेऊ या. बिटुमिन मॅकडम मध्ये कचऱ्यातील प्लास्टिकचा रस्त्यामध्ये पुर्नवापर केल्याने पर्यावरणावर होणारा हानिकारक परिणाम सहज टाळणे शक्य आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून बिटुमिन पद्धतीने कळमेश्वर तालूक्यातील सेलू-कळम येथे पर्यावरणपूरक रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन अंतर्गत या अभिनव उपक्रमाची सुरवात झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन विभागाने बांधकाम विभागातील अभियंते, हॉटमिक्स प्लाँन्टचे मालक व कंत्राटदार यांच्यासाठी बिटुमिन रस्त्याचे बांधकामासंदर्भात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गिरी यांनी प्रात्यक्षिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून बिटुमिन मॅकडम साठी प्लास्टिकचा उपयोग करून पर्यावरण पूरक आणि दिर्घकाळ टिकणारा रस्ता तयार करणे सुलभ आहे यासंदर्भात अभियंते व कंत्राटदार यांचे प्रात्याक्षिक व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गिरी यांनी मार्गदर्शन केले.

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे प्रत्यक्ष हॉटमिक्स प्लॅन्टवर प्रशिक्षण व प्रात्याक्षिक आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणात बिटुमिन मॅकडमसाठी आवश्यक विविध आकाराच्या खडीच्या अचूक प्रमाणाचे प्रात्याक्षिक पद्धतीने मोजमाप करण्यात आले. तसेच हॉटमिक्स प्लँट मधून वितरित होणाऱ्या मिश्रणाचे प्रत्यक्ष तपासणी करून ईलेक्ट्रॉनिक आणि यांत्रिक समक्रमण (सिंक्रोनायजेशन) कसे करावे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. या अनोख्या उपक्रमामूळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते तसेच कंत्राटदारांना प्रत्यक्ष प्लँटवर संपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली या उपक्रमास सार्वजनिक बांधकाम विभागाचे ३८ अभियंते उपस्थित होते. प्लॅस्टिक कचऱ्याचा योग्य प्रकारे पुर्नवापर करून पर्यावरणपुरक रस्ते निर्माण करण्याची दिशा या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळाल्याचे यावेळी प्रशिक्षणार्थ्यांनी सांगितले.

बिटुमिन रस्त्याचे बांधकाम कळमेश्वर तालूक्यातील सेलू-कळंब या रस्त्यावर करण्यात आले आहे. या उपक्रमाची जबाबदारी उपविभागीय अभियंता रूपेश बोदडे यांच्याकडे सोपविण्यात आली असून रस्ता निर्मितीसाठी कंत्राटदार आनंद अशोक बुधराजा यांनी पुढाकार घेतला आहे. कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गिरी व उपविभागीय अभियंता रूपेश बोदडे यांनी बिटुमिन बांधकामासंदर्भात प्रत्यक्ष रस्ता बांधकामाचे प्रात्यक्षिक यावेळी सादर केले.