नागपूर : नागपूर महापालिकेच्या कारवाईने नैराश्यात गेलेला एक चहा विक्रेत्याने झोपच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यापूर्वी त्याने सुसाइड नोट लिहली आणि ती नोट काँग्रेसचे पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांना द्यायला त्यांच्या सुभाषनगर येथील जनसंपर्क कार्यालयात पोहचला. नंतर जे घडले ते धक्कादायक होते.

सदर येथील रॉबर्ट फ्रान्सिस यांची एका शाळेच्या मैदानात चहाचे टपरी होती. नागपूर महापालिकेने ती पाडली. रोजगाराचे साधन गेल्याने तो नैराश्यात गेला, त्याने झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि एक पत्र लिहिले. त्यानंतर तो आमदार विकास ठाकरे यांच्या कार्यालयात ते पत्र देण्यासाठी आणि आमदाराकडून मदत मागण्यासाठी आला. कार्यालयात बसून असताना त्याला उलट्या व्हायला लागल्या. त्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला जवळच्या विवेका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी रुग्णालयातून सुटी घेतली.

रॉबर्ट फ्रान्सिस रा. सदर, नागपूर यांनी बुधवारी ०२/०४/२०२५ रोजी सुभाष नगर, नागपूर येथील आमदार विकास ठाकरे यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली असता असे निदर्शनास आले की सदर व्यक्ती दारू पिऊन आलेला होता. आमदार जनसंपर्क कार्यालयामध्ये बसलेले असताना त्यांनी दोन वेळा उलटी केलली होती. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने मी स्वतः त्याना विवेका हॉस्पिटल, सुभाष नगर, नागपूर येथे दाखले केले.

दरम्यान, रॉबर्ट फ्रान्सिस यांच्या पत्नीने काही वेळा नंतर आमदाराच्या कार्यालयाला भेट दिली असता त्यानी संपूर्ण प्रकरण माझ्या निदर्शनास आणून दिले की, रॉबर्ट फ्रान्सिस हे मागील अनेक दिवसापासून वैयक्तिक कारणास्तव तनावाखाली असल्याने त्यांनी सकाळी एक पत्र लिहून व झोपेचे औषध घेऊन घराबाहेर निघाले व आमदाराच्या कार्यालयामध्ये येऊन बसले. या पत्रात त्याने त्याच्यावर नागपूर महापालिकेतर्फे कारवाई करण्यात आलेली असल्याने ते आत्महत्या करत आहे आणि हे पत्र आमदाराला देत असल्याचे नमुद केले आहे.

यासंदर्भात आमदार विकास ठाकरे यांचे स्वीय सहायक स्वप्नील काटेकर यांनी प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तसेच रॉबर्ट फ्रान्सिसचे पत्र पोलीस ठाण्यात दिले आहे. दरम्यान बुधवारी दिवसभर या घटनेची चर्चा होती. तर्कवितर्क लावले जात होते. आमदाराच्या स्वीय सहाय्याने याबाबत खुलासा केल्यावर घटनाक्रम स्पष्ट झाला. त्यानंतर चर्चेला पूर्ण विराम मिळाला.