नागपूर : विधिमंडळाच्या अधिवेशन काळात स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला जोर येते. विदर्भातील अनेक संघटना मोर्चे काढतात. विदर्भातील आमदार सभागृहात मागणी करतात. अपवादात्मक वेळी विदर्भाबाहेरचे आमदार त्याला पाठिंबा देतात. मात्र बुधवारी विधान परिषदेत महादेव जानकर यांनी विदर्भाच्या प्रस्तावावर चर्चे दरम्यान वेगळ्या विदर्भाची मागणी केली. विधान परिषदेत बुधवारी सकाळी सरकारच्यावतीने २६० अन्वये विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा झाली. त्यावर बोलताना महादेव जानकर यांनी छोटी राज्ये विकासाला पूरक असतात, असे सांगितले. त्यासाठी त्यांनी शेजारच्या तेलंगणा राज्याचे उदाहरण दिले.
हेही वाचा : नक्षलवाद्यांचा गडचिरोलीत उच्छाद! रस्ते बांधकामावरील वाहनांची जाळपोळ
विदर्भाचा विकास स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय होणार नाही, असे जानकर म्हणाले. यावेळी सभागृहात विदर्भातील मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. त्यांच्याकडे पाहात जानकर म्हणाले, “सुधीरभाऊ… तुमचेच पंतप्रधान आहेत, तुमचेच मुख्यमंत्री आहे” असे सांगत वेगळा विदर्भ करा, अशी मागणी केली. राष्ट्रीय समाज पार्टीचा वेगळ्या विदर्भाच्या मागणीला पाठिंबा आहे, असे जाहीर केले. जानकर यांनी विदर्भ विकासासाठी विविध उपाययोजना सूचविल्या. मात्र भाषणाच्या शेवटी त्यांनी विदर्भासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात यावी अशी मागणी केली.