नागपूर : जातीनिहाय जनगणनेची आवश्यकता नाही, ते जाहीर करायची काही आवश्यकता नाही. एका बाजूला आपण जातीयता नष्ट व्हावी असे म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला जातीनिहाय गणना करतो. त्यामुळे जातीगणनेला आमचा विरोध आहे. मात्र आरक्षणाला आमचा विरोध नाही. आरक्षण हे दिलेच पाहिजे अशी संघाची भूमिका असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी व्यक्त केले.
भाजपच्या आणि शिंदे गटाचे मंत्री, आमदार यांनी मंगळवारी सकाळी रेशीमबागेतील स्मृती भवन परिसरात आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गोलवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर श्रीधर गाडगे यांनी सर्व आमदार, मंत्र्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. आपल्या देशात कुठल्याही पद्धतीची जाती विषमता राहू नये, अशी पहिली अपेक्षा आहे. त्याशिवाय कुटुंब पद्धती, पर्यावरण समतोल, नागरिक कर्तव्य आणि आत्मनिर्भर भारत या इतर चार अपेक्षाही गाडगे यांनी आमदारांसमोर व्यक्त केल्या.
हेही वाचा : दुग्ध उत्पादनाच्या विकासावर भर, अकोला जिल्ह्यासाठी ४७१६ कोटींचा ‘पीएलपी’ आराखडा
जातीनिहाय गणनेबद्दल संघाची भूमिका अशी आहे की, जातनिहाय गणनेची आवश्यकता नाही. जात जन्मापासून मिळते. त्यामुळे त्याची मोजदाद करणे आणि ते जाहीर करणे आणि जातीय तेढ निर्माण करणे याची आवश्यकता नाही. संघात जातीयता पाळली जात नाही. संघ जातीचा विचारही करत नाही. त्यामुळे जातीगत गणना करणे, जातीची मोजदाद करणे हे सोयीचे नाही, असे आम्हाला वाटते. मात्र आमचा आरक्षणाला विरोध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजकीय स्वार्थासाठी अशा मागण्या होत असतात. राजकीय लोकांनी ते करू नये, अशी आमची भूमिका आहे, असेही गाडगे म्हणाले. दोन वर्षांनी संघाचे शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे शताब्दी वर्षात संघाच्या समाजाकडून काय अपेक्षा आहे आणि लोकप्रतिनिधींकडून संघाला काय अपेक्षित आहे, याबाबत त्यांनी माहिती दिली.