नागपूर : नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयात बनावट कागदपत्रावरून परराज्यातील वाहनांची नोंदणी प्रकरणात पुण्यातील गुन्हे शाखेचे पथक नागपूरला आले होते. पथकाने मंगळवारी आरटीओ कार्यालयातून चार राज्यातील वाहनांशी संबंधित कागदपत्र ताब्यात घेतले. याप्रसंगी काही कर्मचारी-अधिकाऱ्यांची चौकशीही झाली.
पुणे पोलिसांना काही आठवड्यापूर्वी पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती हद्दीत दोन चोरीची जड वाहने आढळली. या वाहनांची नोंदणी ठाणे व त्यापूर्वी नागपूर ग्रामीण आरटीओतून झाल्याचे पुढे आले. तपासणीत बनावट कागदपत्रावरून या वाहनांची नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयात नोंदणी झाल्याचे पुढे आले. त्यानंतर पुणे पोलिसांनी गुन्हे शाखेचे एक अधिकारी व कर्मचारी असलेले पथक नागपूर ग्रामीण आरटीओत आले.
हेही वाचा : सावधान! राज्यात मागील वर्षीच्या तुलनेत ‘डेंग्यू’चे रुग्ण दुप्पट!
सदर पथकाने आरटीओ अधिकाऱ्यांना गेल्या तीन वर्षांत सगळ्याच वाहनांच्या नोंदणीची कागदपत्रे मागितली. परंतु, कागदपत्रे खूपच जास्त संख्येने असल्याचे बघत शेवटी नागालॅन्ड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, हिमाचल प्रदेश या चार राज्यातील वाहनांच्या नोंदणीची सुमारे ५० ते ६० वाहनांचे कागदपत्रे या पथकाने मंगळवारी ताब्यात घेतली. त्यानंतर हे पथक पुन्हा पुण्याकडे रवाना होणार असल्याचे संकेत होते. या पथकाने काही अधिकारी-कर्मचाऱ्यांची प्राथमिक चौकशीही केली. या प्रकरणाच्या चौकशीमुळे नागपूर ग्रामीण आरटीओतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
शासनाच्या समितीकडूनही झडती
परराज्यातील जड वाहनांची बनावट कागदपत्रावरून नोंदणी प्रकरणाचे गांभीर्य बघत परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांच्या नेतृत्वात समिती बनवली. सदर समितीने मंगळवारी नागपूर गाठत चौकशी सुरू केली. याप्रसंगी समितीने विविध कागदपत्रांची मागणी करत अधिकाऱ्यांची जबानीही घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.
हेही वाचा : …तर पदमुक्तीची टांगती तलवार! काँग्रेसच्या शिवानी वडेट्टीवार, अभिषेक धवड यांना कारणे दाखवा नोटीस
पुणे गुन्हे शाखेचे पथक नागपूर ग्रामीण कार्यालयात आले होते. पथकाने नागालॅन्ड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, हिमाचल प्रदेश या चार राज्यातील नागपूर ग्रामीण कार्यालयात नोंदणी झालेल्या वाहनांचे कागदपत्र सोबत नेले. त्यांना सगळी माहिती उपलब्ध केली जात आहे.
राजेश सरक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण.