नागपूर : सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर लवकरच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानी भेट देणार आहे. त्यानंतर नितीन गडकरी सचिनला वर्धा रोडवरील ‘बर्ड पार्क’ येथे घेऊन जाणार आहेत. याबाबत स्वत: नितीन गडकरी यांनीच माहिती दिली.नितीन गडकरी म्हणाले, सचिन तेंडुलकर यांच्यासोबत माझी शुक्रवारी भेट झाली. मला नागपुरातील तुमच्या निवासस्थानी लकरच भेट द्यायची असून तेथे पोहे खायचे आहे, असे त्याने मला सांगितले. नागपुरात येऊन माझ्या घरी पोहे खाच, पण सोबतच वर्धा रोडवरील अद्ययावत अशा बर्ड पार्कलाही भेट द्या, अशी विनंती मी सचिनला केली आणि ती त्याने मान्यही केली. त्यामुळे सचिन लवकरच नागपुरात येणार असून येथून ताडोबा जंगलाच्या सफारीला जाताना तो ग्रीन पार्कला भेट देणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

हेही वाचा : Video: येता संकट धैर्य, शौर्यासह लढली माझी आई….! पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी वाघापुढे उभे ठाकले अस्वल

नागपुरातील ऑक्सिजन बर्ड पार्कचे (अमृत महोत्सव पार्क) उद्घाटनप्रसंगी गडकरी पुढे म्हणाले, नागपूरच्या वर्धा रोड वरील जामठा येथे नागपूर – हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील ऑक्सिजन बर्ड पार्क हे एनएचआयने राष्ट्रीय महामार्गावर तयार केलेले पहिले बर्ड पार्क आहे. या पार्क मध्ये कार्बन डाय-ऑक्साइड शोषला जात असून ऑक्सिजन निर्मिती होते. पार्कमध्ये असणाऱ्या तलावात सध्या बदक आणि इतर पक्षी आहेत परंतु येथे फळझाडांची लागवड केल्याने येथे अनेक स्थलांतरित पक्षी सुद्धा येतील. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे रस्ते निर्मिती सोबतच अनेक पर्यावरण संवर्धनाचे पुढाकार घेतले जात असल्याची त्यांनी माहिती दिली. यामध्ये वणी -वरोरा रोडवर सुमारे ८० किलोमीटर रस्त्यावर बांबूचे पर्यावरण पूरक क्रॅश बॅरियरची बांधणी, स्टील ऐवजी उड्डाणपुलाच्या बांधकामांमध्ये ग्लास फायबरचा वापर, रस्ते निर्मितीमध्ये महापालिकेकडून गोळा केल्या जाणाऱ्या कचऱ्याचा वापर, रस्ते निर्मितीसाठी तलाव खोलीकरणातून मिळणारी मातीचा वापर आणि त्या माध्यमातून अकोला, बुलढाणा , वाशिम या जिल्ह्यामध्ये जलसंवर्धनासाठी तलावाचीही निर्मिती यासारख्या उपक्रमांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. याप्रसंगी खासदार श्यामकुमार बर्वे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष कुमार यादव आणि इतरही नेते प्रामुख्याने उपस्थित होते.

हेही वाचा : “लोकसभेत केलेली चूक विधानसभेत करू नका,” अजित पवारांचे आवाहन

‘ग्रीन हायवे’अंतर्गत ४ कोटी वृक्षांची लागवड

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने २०१५ मध्ये ग्रीन हायवे धोरणाअंतर्गत आतापर्यंत सुमारे ४ कोटी वृक्ष लागवड केली असून ज्या झाडांचा रस्ते निर्मितीत अडथळा निर्माण होत होता अशा देशभरातील जवळपास ७० हजार वृक्षांचे यशस्वी प्रत्यारोपण देखील केल्याचे गडकरी यांनी सांगितले.