नागपूर : प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील ‘बर्ड फ्लू’ संक्रमणाला केंद्रीय आरोग्य पथकाने गांभीर्याने घेतले आहे. पथकाच्या सूचनेवरून संक्रमित कोंबड्यांच्या संपर्कातील ८७ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे नमुने एम्सच्या प्रयोगशाळेत तपासणीला पाठवण्यात आले तर सर्वेक्षणाचा परिघही १ किलोमीटरवरून तीन किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आला.
८ मार्चला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पशू आरोग्य साथरोग तज्ज्ञ डॉ. प्रभाकर झा, सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ डॉ. कमलेश किराड नागपुरात आले होते. त्यानंतर राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे सहसंचालक डॉ. नवीन सारंग आणि श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. ज्योती हेही नागपुरात पोहचले. हे पथक सातत्याने प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रासह परिसराला भेटी देत प्रतिबंधात्मक उपायांवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, पथकाच्या सूचनेवरून नागपूर महापालिकेने थेट संक्रमित कोंबड्यांच्या संपर्कात आलेल्या ८७ कर्मचाऱ्यांच्या घशातील द्रव्याचे नमुने एम्सच्या प्रयोगशाळेत पाठवले. पथकाच्या सूचनेवरून नागपूर महापालिकेने केंद्राच्या तीन किलोमीटर परिघात सर्वेक्षण सुरू केले आहे. या परिघात सुमारे दीड लाख लोकसंख्या येते. त्यामुळे हे सर्वेक्षण पूर्ण करायला सुमारे चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे. हे पथक आणखी किती दिवस नागपुरात काम करणार आणि त्यांच्या तपासणीत काय पुढे येणार? याकडे या क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : खुशखबर… शिक्षक बदल्यांचा मार्ग मोकळा; राज्यातील शिक्षकांत आनंदाचे वातावरण
झाले काय?
सदर शासकीय ‘कुक्कुट पालन केंद्रात’ बर्ड फ्लूचा उद्रेक होऊन गेल्या काही दिवसात रोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत होता. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत्यूचे कारण तपासण्यासाठी आजारी कोंबड्यांचे नमुने पुणे आणि नंतर भोपाळमधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत पाठवले. चार मार्चला आलेल्या अहवालात या कोंबड्यांना ‘बर्ड फ्लू’ म्हणजे एवियन इन्फ्लुएंजाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. प्रशासनाने नियमानुसार संबंधित कुक्कुटपालन केंद्राचा एक किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र तर दहा किलोमीटरपर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. त्यानंतर पाच मार्चच्या रात्री संबंधित कुक्कुटपालन केंद्रातील ८ हजार ५०१ कोंबड्यांना मारण्यात आले. सोबतच केंद्रातील १६ हजारांहून जास्त अंडीही नष्ट केली गेली. तर या केंद्राच्या १ किलोमिटर परिघात येत असलेल्या पशुवैद्यकीय विद्यापीठाचेही कुक्कुटपालन केंद्र असून तिथल्याही २६० कोंबड्यांना मारण्यात आल्या.
हेही वाचा : नागपुरात परीक्षेच्या तोंडावर कांजण्यांनी डोकं वर काढले! बालरोग तज्ज्ञ म्हणतात…
बर्ड फ्लू म्हणजे काय ?
‘बर्ड फ्लू’ हा आजार एच ५ एन १ या विषाणूमुळे होतो. याला एव्हियन इनफ्लूएन्झा म्हणतात. मुख्यतः हा विषाणू बदक, कोंबड्या आणि स्थलांतरित पक्ष्यांमध्ये आढळतो आणि तो संसर्गजन्य आहे. अनेकदा स्थलांतरित पक्ष्यांमुळे संसर्ग पसरण्याचे क्षेत्र वाढते तो माणसांमध्येही पसरू शकतो. परंतु मानसांना या विषाणूची लागन होण्याचे प्रमाण खूपच कमी असते.