नागपूर : राज्यात परिवर्तनाचे वारे वाहत आहे हे लोकसभा निवडणूकीच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. राज्याला पुन्हा मुख्यमंत्री म्हणून उद्ध‌व ठाकरे हवे आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनविणे हा राज्यातील जनतेचा आवाज आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री पदाबाबत महाविकास आघाडीच अंतिम निर्णय घेणार, पण निर्णय घेताना राज्यातील जनतेचा आवाज लक्षात घ्यावा, असेही राऊत पुढे म्हणाले. खासदार संजय राऊत नागपूरमध्ये शिवसेनाद्वारा आयोजित महारोजगार मेळाव्यात आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा पुनरुच्चार केला. राऊत यांनी यावेळी सांगितले की शिवसेना पक्षाच्या स्थापनेचा मूळ उद्देश रोजगार देणे हा होता. भूमीपुत्रांना रोजगार मिळावा ही शिवसेनेची सुरुवातीपासूनची मागणी राहिली आहे.

हेही वाचा : बुलढाणा: आक्षेपार्ह विधानाचा ‘व्हिडीओ’ सार्वत्रिक, धार्मिक भावना दुखावल्या, रामगिरी महाराजांविरुद्ध गुन्हा

तरुणांना रोजगार देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे झटले होते. एकेकाळी महाराष्ट्र राज्य देशाचे पोट भरण्याचे कार्य करत होते. मात्र मागील काही वर्षात राज्यातील उद्योग, रोजगार पळविले जात आहेत. महाराष्ट्रातून उद्योग, शासकीय संस्था गुजरातमध्ये नेल्यामुळे रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत, असे संजय राऊत म्हणाले. संपूर्ण राज्यात किती बेरोजगारी आहे हे एका विधानसभेमधील रोजगार मेळाव्यातून दिसत आहे. बेरोजगारी दूर करण्यासाठी राज्यकर्त्यांकडे उपाययोजना नाही. पंतप्रधानांकडे पदवी नाही, मात्र देशातील सर्वोच्च पद आहे, अशी टीका राऊत यांनी यावेळी केली.

गडकरी थोडक्यात बचावले

लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला देशातील जनतेने धडा शिकविला. भाजपचे बहुमत कमी केले नसते तर त्यांनी संविधान बदलले असते. मोदींना थांब‌विण्यासाठी विदर्भातील जनतेने पुढाकार घेतला. नागपूरमधून गडकरी थोडक्यात बचावले. लोकांचा त्यांच्यावरील असणाऱ्या प्रेमामुळे ते बचावले मात्र त्यांच्या पक्ष पराभूत झाला, असे संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा : Rakshabandhan 2024: रक्षाबंधन सणाचा इतिहास व महत्त्व…कसे करावे रक्षाबंधन?

गडकरींनी विदर्भात रस्त्याचे जाळे पसरविले. मात्र, त्या रस्त्यातून उद्योग आणले तर रोजगार वाढेल, असा सल्ला राऊत यांनी दिला. विदर्भ हा कधीही मागासलेला नव्हता. विदर्भाकडे श्रम आहे, नैसर्गिक संपत्ती आहे. विदर्भातील नेते पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांकडे बोट दाखवितात, पण विदर्भाची परिस्थिती सुधारण्याची संधी त्यांच्याकडेही होती. आताही देशाची आणि राज्याची सूत्रे नागपूरमधून चालतात, मात्र विदर्भातील नेते विदर्भाला न्याय देण्यात सपशेल अपयशी ठरले आहे, अशी टीका राऊत यांनी केली. यंदा विदर्भात आणि नागपुरात शिवसेनेची मशाल पेटणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur sanjay raut said india and maharashtra is controlled from nagpur tpd 96 css