नागपूर: शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीची मासिक पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. तशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील बऱ्याच शाळा आता सुरू झालेल्या आहेत. तर काही भागात लवकरच सुरू होणार आहे. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६ टक्के इतकी सवलत दिली आहे, म्हणजे केवळ ३३ टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना एसटी बसमधून शालेय प्रवासासाठी मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते. किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापन कडून पास घेतले जात असत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण यंदापासून विद्यार्थ्यांना पास साठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा -महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही. या संदर्भात १८ जुन पासुन एसटी प्रशासनातर्फे ‘ एसटी पास थेट तुमच्या शाळेत ‘ हि विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे.

हेही वाचा : रामटेकमधील काँग्रेसच्या विजयात ठाकरे गटाचेही योगदान – जाधव

एसटीचा सुरक्षित प्रवास

एसटी बसमध्ये दररोज सुमारे ६५ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे एसटीला महाराष्ट्रातील सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे प्रमुख साधन मानले जाते. एसटीमध्ये कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी, गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्ती अशा अनेक बाबींवर भर दिला जातो. सध्या महाराष्ट्रात एसटीमध्ये सुमारे ३४ हजार चालक कार्यरत आहेत. अपघाताची विविध कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने एसटीने चालकांसाठी वेळोवेळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur school students will get st bus pass in school st mahamandal facility for school students mnb 82 css