नागपूर : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात ग्राहक सोने- चांदीचे दागिने खरेदी करतात. यंदा शुक्रवारी या मुहूर्तावर ग्राहकांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के अधिक दागिने खरेदी केल्याचा सराफा व्यावसायिकांचा अंदाज आहे. परंतु दुसऱ्याच दिवशी सोन्याचे दर घसरल्याने दागिने खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली आहे.
नागपूरसह सर्वत्र सोने- चांदीचे दर विक्रमी उंचीवर पोहोचले होते. सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७४ हजारापर्यंत गेले होते. त्यानंतर हे दर प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी ७२ हजारांहून खाली आले. परंतु अक्षय्य तृतीयेच्या दिवशी बाजार उघडताच सोन्याच्या दराने उसळी घेतली होती. यावेळी १० मे रोजी नागपुरात बाजार उघडताच सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्रामसाठी ७२ हजार ८००, २२ कॅरेटसाठी ६७ हजार ७००, १८ कॅरेटसाठी ५६ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ३०० रुपयांपर्यंत पोहोचले. चांदीचा दर प्रती किलो ८४ हजार ५०० रुपये होता.
हेही वाचा…नवनीत राणांच्या अडचणी वाढणार? तेलंगणानंतर आता अमरावतीतही…
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी संध्याकाळपर्यंत नागपुरात सोन्याचे दर आणखी वाढून २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७३ हजार ३०० रुपयांपर्यंत गेले होते. त्यामुळे ग्राहकांना महागड्या दरात सोने खरेदी करावे लागले. परंतु दुसऱ्याच दिवशी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम तब्बल ३०० रुपयांनी घसरले. ११ मे रोजी बाजार उघडल्यावर नागपुरात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्रामसाठी ७३ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ६७ हजार ९००, १८ कॅरेटसाठी ५६ हजार ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ५०० रुपये होते. चांदीचा दर प्रती किलो ८४ हजार ५०० रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती बघता पुढे सोन्याचे दर आणखी वाढणार असल्याने कुणीही चिंता करण्याची गरज नाही, असा दावा सराफा व्यावसायिकांनी केला आहे.