नागपूर : गेल्या वर्षभरात मध्य रेल्वेने तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचे एकूण १८५.४८ किलोमीटर पूर्ण केले. यापैकी नागपूर विभागात ९७.८२ किलोमीटरचे काम झाले असून अजून बरेच काम शिल्लक आहे. महाराष्ट्रात बहुतांश भागात मध्य रेल्वेचे जाळे आहेत. मुंबई, सोलापूर, पुणे, भुसावळ आणि नागपूर विभागात अनेक ठिकाणी तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे. नागपूर हे देशाच्या मध्यभागी असल्याने येथून चारही दिशांना प्रवासी आणि मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होते. विशेषत: नागपूर विभागातून कोळसा, सिमेंट आणि धान्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे रेल्वेमार्ग व्यस्त असतात. त्यावर उपाय म्हणून नवीन रेल्वेमार्ग तयार करण्यात येत आहेत.
मध्य रेल्वेने गेल्या वर्षभरात तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचे एकूण १८५.४८ किलोमीटर पूर्ण केले. यामध्ये नागपूर विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली असून यापैकी ९७.८२ किलोमीटर रेल्वे रुळ टाकून झाले आहे. यामध्ये नागपूर-वर्धा दरम्यान ७६ किलोमीटर तिसरा आणि चौथा रेल्वेमार्ग टाकण्यात येत आहे. यापैकी बुटीबोरी – खापरी स्थानकांदरम्यान (३१.०९ किमी) तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. नागपूर ते इटारसी दरम्यान २६७ किलोमीटर तिसरा रेल्वेमार्ग तयार करण्यात येत आहे. आतापर्यंत नागपूर-आमला सेक्शनमध्ये तिगाव-नरखेड स्थानकांदरम्यान (३०.७८४ किमी) तिसऱ्या रेल्वेमार्गाचे काम झाले आहे. वर्धा ते बल्लारशहा दरम्यान १३२ किलोमीटर तिसरा रेल्वेमार्ग तयार करण्यात येत आहे. आतापर्यंत सेवाग्राम-चितोडा स्थानकांदरम्यान (३.६९७ किमी) तिसऱ्या रेल्वेमार्गाचे पूर्ण झाले आहे. तर वर्धा-कळंब स्थानकांदरम्यान (५० किमी)चे नवीन रेल्वेमार्ग तयार करण्यात आले आहे.
हेही वाचा… मुलीच्या डोळ्यासमोर आईवर वाघाची झडप, जागीच मृत्यू; गडचिरोलीच्या वाकडी जंगलातील घटना
हेही वाचा… राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता; अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम
याशिवाय रेल्वेच्या नागपूर विभागातील १५ स्थानकांवर अमृत भारत स्टेशनची पायाभरणी झाली आहे. यासाठी ३७२.०७ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यापैकी १५ रेल्वेस्थानकांसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. तर सात ७ रेल्वे स्थानकांचा बृहृत आराखडा (मास्टर प्लॅन) तयार करण्यात आला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी दिली.