नागपूर : एका डॉक्टरकडील पाळीव कुत्र्याला नोकराने फिरायला घराबाहेर काढले. काही वेळपर्यंत कुत्र्याला फिरवल्यानंतर कुत्रा एका वृद्धाच्या अंगावर धावून गेला. कुत्र्याने वृद्धाच्या पायाला चावा घेतला. कुत्र्याच्या हल्ल्यामुळे भेदरलेल्या आणि चावा घेतल्याने जखमी झालेल्या वृद्धाने थेट पोलिसात लेखी तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी एका डॉक्टरच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. कल्पना अनिल चौधरी (६२, एमआयजी कॉलनी, वकीलपेठ, रेशीमबाग) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे.

गेल्या २ एप्रिल रोजी कल्पना यांचे पती अनिलराव चौधरी (६५) हे त्यांच्या घरातील कुत्र्याला घेऊन सायंकाळी साडेचार वाजता फिरायला गेले. त्यांच्या शेजारी डॉ. पंडित राहतात. त्यांच्याकडे ‘गोल्डन रॉटव्हिलर’ प्रजातीचा कुत्रा आहे. कुत्र्याला हाताळणारा नोकरसुद्धा त्याला त्याच वेळी फिरायला बाहेर घेऊन आला. त्या कुत्र्याने चौधरी यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला केला. चौधरी यांनी कुत्र्याला वाचवण्यासाठी धाव घेतली असता डॉ. पंडित यांच्याकडील कुत्र्याने त्यांना चावा घेतला. परिसरात कुणीच नसल्याने कुत्रा चौधरींवर हल्ला करतच होता. तो नोकरसुद्धा कुत्र्यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरला. त्यामुळे कुत्र्याच्या हल्ल्यात चौधरी जखमी झाले.

काही वेळाने डॉ. पंडित यांच्या पत्नी तेथे आल्या व त्या कुत्र्याला शांत करून परत घरी घेऊन गेल्या. जून २०२४ मध्येदेखील तो कुत्रा कल्पना चौधरी यांना चावला होता. त्यावेळी डॉ. पंडित यांच्या पत्नीला कुत्र्याबाबत योग्य उपाययोजना करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, तो कुत्रा सातत्याने लोकांवर भुंकतो व धावून जाऊन चावतो. अखेर या घटनेनंतर कल्पना यांनी तक्रार केली. पोलिसांनी डॉ. पंडित यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी, कुत्र्याने चावा घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, कुत्र्याच्या मालकाविरुद्ध तक्रार करायला गेल्यास पोलीस टाळाटाळ करतात. तसेच कुत्र्याच्या मालकाला उपचाराचा खर्च देऊन गुन्हा दाखल न करण्याचा सल्ला देतात. अशा अनेक घटना तक्रारीअभावी किंवा पोलिसांच्या सल्ल्याअभावी पोलीस ठाण्यात दाखल होत नाहीत, हे विशेष.

पाळीव कुत्र्याने एका वृद्धावर हल्ला करीत चावा घेतला. त्यामध्ये ते वृद्ध जखमी झाले. वृद्धाच्या लेखी तक्रारीवरुन आम्ही गुन्हा दाखल केला.

राहुल शिरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, इमामवाडा)