नागपूर : सध्या चर्चेत असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण‘ योजनेसाठी आपले सरकार सेवा केंद्रातून अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेकडो महिला केंद्रांवर गर्दी करीत आहे. मात्र केंद्र चालकांना यासाठी कुठलेही मानधन मिळत नसल्याने त्यांनी सोमवारी संप केला. त्यामुळे केंद्रातून मिळणाऱ्या इतर प्रमाणपत्राचे काम बंद पडले. परिणामी पालक व विद्यार्थ्यांची गैरसोय झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेची घोषणा झाली. या योजनेत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मानधन शासनाकडून दिले जाणार आहे. या योजनेसाठी अर्ज भरण्याची सोय अंगनवाडी केंद्र, महाऑनलाईन केंद्र व शासनमान्यता प्राप्त खासगी सेतू केंद्रात (आपले सरकार सेवा केंद्र )सोय उपलब्ध करून दिली आहे.अर्ज भरून देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मानधन दिले जाते. अर्ज भरण्याची सुविधा ऑनलाईनही उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज भरण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत असल्याने शहरातील शासनमान्य खासगी सेतू केंद्रात महिला गर्दी करू लागल्या आहेत. सेंतू केंद्र चालकांना अर्ज भरून देण्याची सक्ती करण्यात आली असली तरी त्यांना यासाठी वेगळे मानधन दिले जात नाही. अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट असल्याने व त्यासाठी लागणारा वेळ, वीज आणि मनुष्यबळाचा विचार केला तर केंद्र चालकाला शासनाने मानधन द्यायला हवे, मात्र तसे न करता तक्रार आल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. केंद्राची मान्यता रद्द करण्यात येणार आहे, हा केंद्र चालकांवर अन्याय आहे. शासनाने प्रती अर्ज १०० रुपये केंद्र चालकाला द्यावे, या मागणीसाठी राज्य भरातील सेतू केंद्र चालकांनी आज बंद पुकारला. नागपूर जिल्ह्यात ४२०० सेतू केंद्र सोमवारी बंद होते. तेथील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. सध्या शाळा महाविद्यालय प्रवेशाचे दिवस आहेत. यासाठी लागणारे सर्व प्रकारचे प्रमाणपत्र सेतू केंद्रातूनच दिले जाते. संपामुळे हे कामही ठप्प पडल्याने विद्यार्थी, पालकांची प्रचंड गैरसोय झाली. दरम्यान सेंतू केंद्र चालकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे निदर्शने केली व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना दिले.

हेही वाचा : बुलढाणा : खामगावात अतिवृष्टीचे तांडव; आवार मध्ये ढगफुटी सदृश पाऊस, पुराने वेढलेल्या नऊ व्यक्ती…

लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट आहे. साधारणपणे एक अर्ज भरणे, त्यासाोबत कागदपत्र जोडणे, त्याची तपासणी यासाठी एक तासाहून अधिक वेळ लागतो, त्यासाठी मनुष्यबळ लागते, विजेचा खर्च येतो. मात्र सरकारकडून आम्हाला याकामासाठी काहीच मानधन दिले जात नाही. आम्ही सरकारी कर्मचारी नाही, त्यामुळे हा खर्च केंद्र चालकांना न परवडणारा आहे. त्यामुळे शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हालाही मानधन द्यावे

राजेंद्र चौरागडे, सेतू केंद्र चालक, नागपूर
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur setu suvidha kendra owners agitation due to ladki bahin yojana cwb 76 css
Show comments