नागपूर : मित्रांसह खेळायला घराबाहेर पडलेल्या सात वर्षीय चिमुकला रविवारी अचानक बेपत्ता झाला. त्याच्या पालकांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. मात्र, सोनेगाव पोलिसांनी गांभीर्य न दाखवता वेळीच दखल घेतली नाही. त्यामुळे सोमवारी दुपारी त्या चिमुकल्याचा सोनेगाव तलावात मृतदेह आढळला. त्या मुलाचा संशयास्पद मृत्यू असून घात की अपघात झाला, याबाबत चर्चेला उधान आले आहे. साहिल रामप्रसाद राऊत (७, सहकारनगर) असे मृत मुलाचे नाव आहे.
रामप्रसाद राऊत हे एका निर्माणाधीन इमारतीवर बांधकाम मजूर आहेत. त्यांची पत्नी धुणीभांड्याचे काम करते. त्यांना १३ वर्षांची मुलगी आणि ७ वर्षाचा साहिल नावाचा मुलगा आहे. साहिल हा पहिल्या वर्गाचा विद्यार्थी आहे. तो रविवारी सकाळी ११ वाजता घरातून खेळायला बाहेर पडला. त्याने बहिणीला खेळायला जात असल्याचे सांगितले. परंतु, तो सायंकाळ होईपर्यंत घरी परत आला नाही. त्यामुळे सायंकाळी कामावरून घरी आलेल्या आई-वडिलांना मुलीने साहिल घरी न आल्याचे सांगितले. त्यामुळे तिघांनीही शेजाऱ्यांच्या मदतीने शोधाशोध केली. मात्र, साहिल मिळून आला नाही. रात्रीला राऊत दाम्पत्य सोनेगाव पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली.
हेही वाचा : धक्कादायक! हुडकेश्वरच्या हवालदाराकडे चक्क आरोपीची कार, जप्तीच्या मुद्देमालाचा पोलिसांकडूनच वापर
मात्र, बराच वेळ त्यांच्या तक्रारीची सोनेगाव पोलिसांनी दखल घेतली नाही. पोलिसांनी गांभीर्य न दाखविल्यामुळे दाम्पत्यानी रात्रभर शोधाशोध केली. सोमवारी आज सकाळी पुन्हा पोलीस आणि दाम्पत्यानी मुलाचा शोध घेतला. दुपारी १२ वाजता साहिलचा मृतदेह सोनेगाव तलावाच्या पाण्यात तरंगताना दिसला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरिय तपासणीसाठी मेडिकलमध्ये रवाना केला. या प्रकरणी तुर्तास सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र, साहिलच्या मृत्यूबाबत अनेकांनी संशय व्यक्त केल्याने सोनेगावचे ठाणेदार बळीराम परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.