नागपूर : धरमपेठमधील नेचर ब्युटी पार्लरच्या दोन संचालक तरुणींनी काही विद्यार्थिनींना झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवून चक्क देहव्यवसाय करण्यास भाग पाडले. तिने ब्युटीपार्लरमध्ये त्या तरुणींना आंबटशौकीन ग्राहकांसाठी उपलब्ध केले होते. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग (एसएसबी)ने धरमपेठ परिसरातील ब्युटी सलूनवर धाड टाकून देह व्यवसाय उघडकीस आणली. चौकशीत सलूनच्या संचालिक स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी तरुणींकडून देह व्यवसाय करून घेत असल्याचे समोर आले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोन्ही महिलांना ताब्यात घेतले. अकांक्षा उर्फ रितिका उर्फ कुमुद हिरालाल मेश्राम (२६) रा. रामनगर आणि सोफिया उर्फ नीतू जाकीर शेख (३०) रा. नूरनगर, महादुला, अशी आरोपी महिलांची नावे आहेत.
धरमपेठच्या वेस्ट हायकोर्ट मार्गावरील नेचर ब्युटी पार्लरमध्ये सलूनच्या आड देहव्यवसाय सुरू आहे. संचालकांकडून सलूनमध्ये येणाऱ्या आंबटशौकीन ग्राहकांना मुली आणि जागा उपलब्ध करून दिली जात होती. गेल्या काही दिवसांपासून या ब्युटीपार्लरमध्ये पुरुष ग्राहकांची संख्या वाढली होती. त्यामुळे नागरिकांना संशय आला होता. येथे अल्पवयीन मुलीसुद्धा देहव्यापारासाठी उपलब्ध करून दिल्या जात होत्या. या देहव्यापाराची जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी शुक्रवारी रात्री बनावट ग्राहक बनवून सलूनमध्ये पाठवले. बनावट ग्राहकाने खात्री पटवून इशारा करताच पोलिसांनी तेथे धाड टाकली. झडतीमध्ये ३ विद्यार्थिनी ग्राहकांसाठी उपलब्ध मिळून आल्या. तीनही विद्यार्थिनी नागपुरातीलच असून गरीब कुटुंबातील आहेत. त्यांच्या गरीबीचा फायदा उचलून आकांक्षा आणि सोफियाने त्यांना पैशांचे आमिष दाखवत देह व्यवसायाच्या नरकात ढकलले होते. पोलिसांनी तिन्ही तरुणींना ताब्यात घेत अकांक्षाला अटक केली. दोन्ही आरोपी महिलांवर सीताबर्डी ठाण्यात पीटा अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांच्या हाती एक डायरी लागली असून त्यात जवळपास पाचशेवर ग्राहकांची नावे आणि पत्ते आहेत. त्यामुळे येथे अनेक दिवसांपासून देहव्यापार सुरु होता, अशी माहिती समोर आली आहे. आतापर्यंत ही कारवाई पोलीस निरीक्षक कविता इसारकर, प्रकाश माथनकर, शेषराव राऊत, अजय पौनिकर, अश्विन मांगे, नितीन वासणे, कुणाल मसराम, लता गवई आणि पूनम शेंडे यांनी केली.
गर्भवती असतानाही देहव्यापार थाटला
ब्युटी पार्लरची दुसरी संचालिका सोफिया ऊर्फ नीतू शेख हिने प्रेमविवाह केला आहे. ती सध्या गर्भवती आहे. गर्भवती असतानाही ती काही विद्यार्थिनींना आंबटशौकीन ग्राहकांसाठी ब्युटी पार्लरमध्ये बोलवत होती. ती विद्यार्थिनींना केवळ ५०० रुपये एका ग्राहकासाठी देत होती. तर ग्राहकांकडून ती पाच ते ७ हजार रुपये उकळत होती. गर्भवती असल्यामुळे पोलिसांनी तिला अटक केली नाही. तिला सूचनापत्र देऊन सोडण्यात आले.