नागपूर : स्पा आणि मसाजच्या नावाने सलूनमध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा घातला. सलूनमध्ये एक तरुणी देहव्यापार करताना आढळून आली. आरोपींविरुद्ध गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. अंशुल बावनगडे (३०), सीमा बावनगडे (३४) रा. पाचपावली अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. देहव्यापार करताना सापडलेल्या तरुणीला पैशाचे आमिष दाखवून देहव्यापार करवून घेण्यात येत होता.
अंशुल आणि सीमा पती-पत्नी आहेत. सीमा धंतोलीत ब्युटीपार्लर चालविते तर अंशुल हा गिट्टीखदान ठाण्यांतर्गत भूपेशनगरात ‘द वेला युनिसेक्स स्पा-सलून अकॅडमी’ या नावाने स्पा-मसाज सेंटर चालवितो. पीडित युवती २१ वर्षांची असून मूळची उत्तर प्रदेशची आहे. काही वर्षांपूर्वी तिचे कुटुंब विदर्भात स्थायी झाले. तिला आई-वडील आणि चार भावंडे आहेत. आर्थिक स्थिती नाजूक असल्याते पीडित युवती महिन्याभरापूर्वी नागपुरात कामाच्या शोधात आली. तिला काम मिळाले, मात्र पैसे कमी असल्याने तिने काम सोडले. काम शोधत असताना तिला सीमाचा पत्ता मिळाला. तिच्याकडे कामाला गेली.
हेही वाचा : गडचिरोली : महिला अधिकाऱ्याने संपत्तीसाठी केली सासऱ्याची हत्या, केवळ पैशांच्या हव्यास, कारकीर्दही वादग्रस्त !
दरम्यान, याच व्यवसायात असलेल्या एका महिलेने तिची मदत केली. तिच्या राहण्याची व्यवस्था केली. दरम्यान सीमाने तरुणीला अंशुलकडे पाठविले. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याने तरुणीला पैशाचे आमिष दाखवून देहव्यवसायात ढकलले. या देहव्यापाराच्या अड्ड्याची कुणकुण पोलिसांना लागली. पोलीस निरीक्षक कविता ईसारकर यांनी मिळालेल्या माहितीची खात्री करून घेतली. नंतर सापळा रचला. एका बनावट ग्राहकाला सलूनमध्ये पाठवले. सौदा पक्का होताच त्याने इशारा केला. दबा धरून बसलेल्या पथकाने धाड मारली. घटनास्थळाहून तीन मोबाईल, दुचाकी, रोख दीड हजार व इतर साहित्य, असा एकूण एक लाख ९२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सीमा हिने आतापर्यंत शहरातील अनेक मसाज सेंटरमध्ये तरुणींना पाठविले आहे. तिने अनेक तरुणींना देहव्यापाराच्या दलदलीत ढकलले आहे.
सीमा पुरवायची देहव्यापारासाठी तरुणी
देहव्यापारासाठी सीमा ही तरुणींना वेगवेगळ्या सलूनमध्ये पाठवित होती. अंशुलची सखोल चौकशी केली असता त्याने सीमाचे नाव सांगितले. पती-पत्नीच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. दरम्यान, पीडित तरुणीची चौकशी करून तिला सोडण्यात आले. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निमीत गोयल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक कविता ईसारकर, हवालदार प्रकाश माथनकर, लक्ष्मण चवरे, अजय पौनीकर, कमलेश क्षीरसागर, कुणाल मसराम, लता गवई, पूनम शेंडे यांनी केली.