नागपूर : मुंबईहून नागपूरमार्गे पश्चिम बंगलाकडे निघालेल्या शालिमार एक्स्प्रेस मंगळवारी कळमना रेल्वे स्थानकाजवळ घरसली. गाडीची गती कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली . परंतु अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. एलटीटी- शालिमार एक्सप्रेस सोमवारी मुंबईहून निघाली. ही गाडी मंगळवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास इतवारी स्थानकाहून गोंदियाकडे निघाली. कळमना स्थानकजवळ असताना एका शयनयान (एस२) डब्याची चार चाके घरसली. तसेच एका पार्सल व्हॅनचे देखील चार चाक रुळावरून घरसले. गाडी रुळावरून घसरताच या डब्यातील प्रवासी एकमेकांवर आदळले. तसेच वरील बर्थवरील (आसन) वस्तू खाली पडल्या. त्यामुळे अनेक प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. घटनेची माहिती रेल्वे नियंत्रण कक्षाला मिळताच रेल्वेच्या मदत व बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. प्रवाशांना डब्यातून काढण्यात आले. तसेच घसरलेले दोन्ही डबे गाडीपासून वेगळे करण्यात आले.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार एलटीटी- शालिमार एक्स्प्रेस दुपारी १ वाजून ५४ मिनिटांनी कळमना रेल्वे स्थानकाच्या जवळ (कळमना यार्ड) घसरली. ही गाडी इतवारी स्थानकावरून चार क्रमांकाच्या रुळावरून पुढे निघाली होती. त्यावेळी इंजीनपासून तिसऱ्या क्रमांकावरील पार्सल व्हॅनचे चार चाके अचानक घसरले. तसेच इंजीनपासून १२ क्रमांकावर असलेला शयनयान (एस२) डब्याचे चार चाके घसरली. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. घटनास्थळी दक्षिण -पूर्व-मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नमिता त्रिपाठी, अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक पी. चंद्रकापूरे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंह पोहोचले. या घटनेची माहिती देण्यासाठी नागपूर, इतवारी, गोंदिया, डोंगरगड, दुर्ग आणि राजनांदगाव स्थानकावर हेल्पलाईन सुरू करण्यात आली. आणि घटनेचा तपासाचे आदेश देण्यात आले.

हेही वाचा : “योगेंद्र यादव यांची टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा”, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

या घटनेमुळे कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेसला इतवारी रेल्वे स्थानकाऐवजी कळमना मार्गे सोडण्यात आले. त्यामुळे या गाडीच्या प्रवाशांनी कळमना किंवा नागपूर स्थानकावर पोहोचण्याचे आहवान प्रशासनाने केले. याशिवाय इतवारी-रायूपर पॅसेंजर, इतवारी-गोंदिया मेमू आणि गोंदिया- इतवारी मेमू, पुरी-गांधीधाम एक्स्प्रेस, विदर्भ एक्सप्रेस, पुरी- अजमेर सुपरफास्ट एक्स्प्रेस, इतवारी-रिवा एक्स्प्रेस या गाड्या विलंबाने धावत आहेत.

गाडी रवाना

या गाडीचा एस- २ हा डबा रुळावरून घरसला. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या डब्याला लागून असलेला एस१ डबा देखील गाडीपासून वेगळा करण्यात आला. त्यानंतर शालिमार एक्सप्रेसला दोन शयनयान डबे जोडण्यात आले. त्यामध्ये प्रवाशांची व्यवस्था करण्यात आली. ही गाडी रात्री साडे सातच्या सुमारास शालिमारकडे रवाना करण्यात येईल, असे रेल्वेचे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंह यांनी सांगितले.