नागपूर : दुसऱ्याच्या काठीने विंचू मारावा एवढी शिवसेना (ठाकरे गट) कमकुवत झालेली नाही. सुनील केदार यांनी रामटेकमध्ये गद्दारी केली हे स्पष्ट आहे. मारूतीच्या बेंबीत लपलेला विंचू म्हणेज सुनील केदार आहेत, अशी जहरी टीका शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केली.
रामटेकमध्ये शिवसेनेचे (ठाकरे गट) विशाल बरबटे उमेदवार आहे. येथे काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली आहे. सुनील केदार यांनी शिवसेनेचे (शिंदे) उमेदवार आशिष जयस्वाल यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली. त्याचा बदला घेण्यासाठी राजेंद्र मुळक येथे निवडणूक लढत असल्याचे वक्तव्य प्रचारसभेत केला होता.
हेही वाचा : आकाशात झेपावलेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन अन्…
त्यावर भास्कर जाधव म्हणाले, माझ्याकडे पूर्व विदर्भातील २८ जागांचे कार्यक्षेत्र आहे. त्या २८ जागांपैकी फक्त एक जागा आम्हाला मिळाली आहे. तिथेही काँग्रेसने त्यांचा बंडखोर उमेदवार उभा केला आहे. त्याच्या व्यासपीठावर तुम्ही जाता ही गद्दारी नाही का? तुम्ही उद्धव ठाकरेंना काय मदत करता आहात?, असे संतप्त सवाल जाधवांनी उपस्थित केला.
सुनील केदार हे मारुतीच्या बेंबीत बसलेले विंचू आहेत हे शिवसेनेने वेळीच ओळखावे. मारुतीच्या बेंबीत बोट घातल्यानंतर गार गार लागत असेल, पण बाहेर आल्यानंतर प्रत्येकजण बोंबलत येतो. कारण आत विंचू बसलेला असतो. तो नांगी मारतो. सुनील केदार हे मारुतीच्या बेंबीत बसलेले विंचू आहेत. इतका विश्वासघात कुठल्याही मित्रपक्षाने आघाडीत करू नये, अशी टीकाही भास्कर जाधव यांनी केली.
शिवसेना स्वतःच्या हिमतीवर गद्दारी करणाऱ्यांशी सामना करण्यास समर्थ असल्याचे जाधव म्हणाले. आमच्या उमेदवाराने गद्दारी केली म्हणून रामटेकमध्ये काँग्रेसने गद्दारी करुन उमेदवार देणे ही पण गद्दारीच असे म्हणत भास्कर जाधवांनी सुनील केदारांवर जोरदार हल्लाबोल केला.
हेही वाचा : “‘शेटजी-भटजी’च्या पक्षाला ओबीसी नेत्यांनी मोठे केले”, पटोले म्हणतात, “बावनकुळेंनी अपमान सहन करण्यापेक्षा…”
रामटेक या जागेवर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण, गद्दारी करुन आशिष जयस्वाल हे शिवसेना शिंदे गटात गेले होते. त्यांना धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे भास्कर म्हणाले. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गेम करणारी शिवसेना नाही. आम्ही २७ जागांवर तुम्हाला मदत करत आहोत. तुम्ही मात्र, आमच्या एका जागेवर गद्दारी करत आहात, असे भास्कर जाधव म्हणाले. तुम्ही आम्हाला मदत करत नाहीत, तुम्ही आमच्याशी गद्दारी करत आहात.
© The Indian Express (P) Ltd