नागपूर: मध्य नागपूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारार्थ मंगळवारी आयचित मंदीर चौकात सभा झाली. याप्रसंगी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नागपूर शहर प्रमुख नितीन तिवारी यांनी मंचावरून भाजपचे नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक करत काँग्रेस उमेदवार बंटी शेळकेंसाठी मतांचा जोगवा मागितला.
विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराला आता वेग येत आहे. राज्यातील अनेक भागात प्रमुख लढत महायुती आणि महाविकास आगाडीत आहे. दरम्यान दोन्ही पक्षाचे नेते एक मेकांवर आरोप- प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाही. निवडणूकीची तारीख जवळ येत असतांना या आरोपाची तिव्रता व पातळीही खालवत आहे. त्यातच मध्य नागपुरातील आयचित मंदीर परिसरातील मंगळवारच्या काँग्रेसच्या सभेत एकदम उलटे चित्र पुढे आले. येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारादरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नागपूर शहर प्रमुख नितीन तिवारी यांनी भाजपचे नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरींचे कौतुक केले.
हेही वाचा : अखेर काँग्रेसनेही घेतला कठोर निर्णय…माजी मंत्र्यांसह तब्बल सहा…
नितीन तिवारी म्हणाले, भाजप उमेदवार प्रवीण दटके सध्या विधान परिषदेवर आमदार आहेत. त्यांच्या आमदारकीला आणखी बराच अवधी शिल्लक आहे. त्यामुळे त्यांच्याएवजी मध्य नागपुरातून बंटी शेळकेंना लोकांनी निवडून दिल्यास प्रवीण दटकेंचे वाईट होणार नाही. ते आमदारच राहणार. बंटी शेळके मात्र निवडून विधानसभेवर गेल्यास या भागाला आणखी एक आमदार मिळेल. सोबत नितीन गडकरी यांच्या नंतर आणखी एक चांगले नेतृत्व या भागाला बंटीमुळे मिळणार आहे. गडकरींचे नेतृत्व लोक संघर्षातून पुढे आले होते. आता बंटी शेळकेही नागरिकांच्या प्रश्नावर संघर्ष करत आहे. गडकरींनी चांगल्या कामाच्या जोरावर देशभरात नावलौकिक केला. बंटी शेळकेलाही निवडून दिल्यास तोही देशात आपले नाव मोठे करेल, असेही तिवारी म्हणाले. बंटीने कोविड काळात स्वत: फाॅगींग व किटकनाशक घेऊन सर्वत्र फवारणी केली. भाजपचा एकही आमदार याकाळात रस्त्यावर नव्हता. दुसरीकडे डासांचा प्रकोप वाढल्यावरही बंटी थेट किटकनाशक फवारणी घेऊन सर्वत्र फिरत असतो. नागरिकांना भेडसावणारा कचऱ्याचा प्रश्न असो वा इतर कोणताही प्रश्न असल्यास बंटी नेहमी पुढे येऊन तो सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही तिवारी म्हणाले. याप्रसंगी युवक काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्ष सोनल लक्ष्मी घात, काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे हा व्हिडिओ काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी स्वत:च्या फेसबुक पेजवरून शेअर केला.