नागपूर : एका घटस्फोटीत महिलेचे वडील आणि भाऊ पाच महिन्याच्या अंतरातच दगावले. त्यानंतर महिला, तिचे दोन मुले व आई असे कुटुंब उघड्यावर आले. नियमावर बोट ठेवत मध्य रेल्वेने तीन वेळा अनुकंपा तत्वावर नोकरी नाकारली. परंतु केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वे मंत्रालयासोबत पाठपुरावा केल्यावर या महिलेला नोकरी मिळाली.
मध्य रेल्वेच्या सेवाग्राम रेल्वे स्थानकावर पंप ड्रायव्हर म्हणून रामभाऊ थूल नोकरी करायचे. मार्च २०१९ मध्ये सेवेवर असतांना रेल्वे अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यावर अवलंबून असलेली त्यांची पत्नी नीरावंती आणि मुलगा नितीनचे कुटुंब उघड्यावर आले. दरम्याव रामभाऊ यांची मुलगी स्मिता हिचे घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे ती देखील आपल्या दोन मुलांसह माहेरीच राहायला आली होती.
हेही वाचा : वाशिम: ‘स्ट्रीट लाईट’च्या प्रकाशाने शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पीक धोक्यात; शेतकरी अनोख्या संकटात
स्मिता व तिचे दोन मुलेही रामभाऊवरच अवलंबून होते. रामभाऊंच्या मृत्यूनंतर पाच जणांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. याप्रसंगी कुटुंबाने नितीनला अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी प्रयत्न करण्याचे ठरवले. परंतु पाच महिन्यांनी नितीनचाही (ऑगस्ट- २०१९) ह्रदयविकाराने मृत्यू झाला. या दोन मोठ्या संकटाने या कुटुंबाची मानसिक स्थिती ढासळली. आता कुटुंबाने मुलगी स्मिताला अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी अर्ज केले. परंतु वडिलांच्या निधनावेळी स्मिताचे घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. त्यामुळे मुलगी व तिची दोन मुले कायद्याने रामभाऊवर अवलंबून नसल्याचे सांगत मध्य रेल्वेने तीन वेळा नोकरी नाकारली.
स्मिताचा घटस्फोट ऑक्टोबर २०२० मध्ये झाले. या कुटुंबाने नितीन गडकरींची भेट घेत मदत मागितली. नितीन गडकरी यांना रेल्वे मंत्रालयासोबत पत्र व्यवहार करून स्मिताच्या नोकरीसाठी पाठपुरावा केला. शेवटी विलंबानेच सही पण स्मिता थूल यांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली. या मदतीसाठी नीरावंती थूल आणि स्मिता थूल यांनी गडकरींचे आभार मानले.