नागपूर : आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या ऑटोरिक्षा चालकाच्या मुलाने जगाचा निरोप घेतांना अवयवदानातून पाच कुटुंबात प्रकाशाची पेरणी केली. नांदेडच्या या मुलाला उपचारासाठी नागपुरातील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते. ओमकार अशोक आकुलवार (२१) रा. मंडवा, ता. किनवट, जि. नांदेड असे अवयवदान करणाऱ्या मुलाचे नाव आहे. तो फर्निचरचे काम करत होता. तर त्याचे वडिल अशोक हे ऑटोरिक्षा चालक आहेत. ओमकारच्या घरची स्थिती हलाखीची आहे. वडिलांनी ऑटोरिक्षाच्या जोरावर मुलाला शिकवले. मुलगा मोठा झाल्यावर हल्ली फर्निचकचे काम करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होता. तर ओमकारला एक बहिण आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

ओमकार हा नांदेडला फर्निचर बनवण्याचे काम आटोपल्यावर २२ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री दुचाकीने घरच्या दिशेला जात होता. वाटेत अचानक त्याच्या दुचाकीपुढे एक प्राणी आडवे आला. जोरात ब्रेक दाबल्यावरही या दुचाकीची प्राण्याला धडक बसून ओमकार खाली पडला. जोरात रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्याला उपस्थितांनी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. कुटुंबियांना कळताच ते रुग्णालयात पोहचले.

दरम्यान, ओमकारची प्रकृती जास्तच खालवतच असल्याने कुटुंबियांनी त्याला नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्नित ट्रामा केअर सेंटरला हलवले. येथे तज्ज्ञांच्या देखरेखीत उपचार सुरू असतांनाही त्याला अल्प प्रतिसाद मिळत होता. तज्ज्ञांकडून करण्यात आलेल्या विविध वैद्यकीय तपासणीत त्याचा मेंदूमृत झाल्याचे पुढे आले. ही माहिती कुटुंबियांना दिली गेली.

घरातील २१ वर्षीय मुलाबाबत वैद्यकीय स्थिती एकूण वडिलांना मानसिक धक्काच बसला. परंतु, त्यांनी स्वत:ला सावरले. दरम्यान विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीकडून ओमकारच्या अवयवदानातून अनेकांना जीवदान शक्य असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आपला मुलगा इतरांच्या रुपाने जगात जिवंत रहावा म्हणून ऑटोचालक वडलांनी धाडसी निर्णय घेत अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे या रुग्णाचे दोन मुत्रपिंड, एक यकृत तीन गरजू रुग्णात प्रत्यारोपीत केले गेले. तर दोन डोळे लवकर गरजूंना प्रत्यारोपीत केले जाणार आहे. त्यामुळे अवयवदान झालेल्या पाच कुटुंबात प्रकाशाची पेरणी होणार आहे.

कोणते अवयव कुणाला?

दाणदाते ओमकार अशोक अकुलवार यांचे यकृत व्होकार्ट रुग्णालयातील ६१ वर्षीय महिला, एक मुत्रपिंड मेडिकलशी संलग्नित सुपरस्पेशालीटी रुग्णालयातील ३८ वर्षीय महिलेला, दुसरे मुत्रपिंड व्होकार्ट रुग्णालयातील ५३ वर्षीय महिलेत प्रत्यारोपीत केले गेले. तर दोन्ही बुब्बुळ मेडिकलच्या नेत्रपेढीला दिले गेले असून तेही दोन रुग्णात प्रत्यारोपीत होणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur son of auto rickshaw driver donated organs after death gives life to others mnb 82 css