नागपूर : अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अवघ्या पाच दिवसांवर आला असताना प्रत्येकजण आपआपल्या परीने यात योगदान देत आहे. एका वैदर्भिय कन्येला मात्र थेट श्रीरामासाठी ‘ड्रेस डिजायनिंग’ करण्याची सुवर्णसंधी मिळाली. देवीदेवतांच्या मुर्तींची जशी विधिवत पुजा केली जाते, तसेच त्यांना दागिने आणि तलम वस्त्र नेसवण्याचीसुद्धा प्रथा आहे. अयोध्येत श्रीराम बालस्वरुपात असल्याने त्यांच्या वस्त्राबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. ही उत्सुकता आता संपली आहे. वैदर्भिय कन्या सोनाली खेडकर हिला श्रीरामासाठी ‘ड्रेस डिजायनिंग’ करण्याची संधी मिळाली. सोनाली ही यवतमाळ येथील नागपुरे कुटुंबातील. लग्नानंतर ती पुण्यातील खेडकर कुटूंबात गेली. पुण्यात तीचे ‘सावरी बाय सोनाली’ या नावाने बुटीक आहे.
पुण्यातील उद्योजिका अनघा घैसास यांनी ‘दो धागे श्रीराम के नाम’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमात सुमारे साडेबारा लाख रामभक्तांनी हातमागावर रामवस्त्रांसाठी रेशमी कापड विणले. या कापडाची वस्त्रे डिझाईन करून ती शिवण्याची जबाबदारी त्यांनी सोनालीवर सोपवली आणि सोनालीने देखील त्यांचा विश्वास सार्थ ठरला. प्रत्यक्ष मुर्ती पाहण्यासाठी त्या जाऊ शकत नसल्याने त्यांनी मुर्तीची उंची किती असेल हे जाणून घेतले. त्यावेळी ५१ इंचाच्या या मूर्तीचे माप कसे घ्यायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. दरम्यान, एवढ्याच उंचीचे एक ग्राहक त्यांच्याकडे आले. त्यावरुन सर्व मोजमाप घेण्यात आले. अनघा घैसास यांनी पूर्ण विश्वासाने सोनालीवर मोठी जबाबदारी सोपवली होती. तब्ब्ल दोन दशकांचा अनुभव सोनाली यांनी पणाला लावला आणि रेशमी वस्त्राचे उपरणे, सोवळे आणि अंगरखा अशा तीन कपड्यांचा एक सेट आणि असे आठ सेट त्यांनी तयार करण्याचे ठरवले.
हेही वाचा : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच बोलले, म्हणाले…
चिपळूनला सासरकडील मुरलीधराचे मंदीर असून तिथे ४८ इंचाची मूर्ती आहे. या मूर्तीसाठी देखील सोनालीने काही वर्षांपूर्वी कपडे शिवले होते. ते मागवले आणि त्यावरुन संकल्पना त्यांना संकल्पना सूचत गेल्या. थोडे संशोधन, अनुभव आणि कल्पना यातून श्रीरामाची वस्त्रे तयार झाली. रंगसंगती, जरीच्या काठांचे काम, कशिदाकारी, मोतीकाम करून रामललाच्या वस्त्रांचे सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न केला. एकूण आठ सेट असले तरीही प्रत्येक सेटमध्ये त्यांनी वैविध्य जपले. निर्धारित वेळेत हे कपडे त्यांनी शिवून पूर्ण केले. या कापडांवर कशिदाकारी, मोतीकाम करणारे सर्व मुसलमान कारागिर, पण त्यांनीही तेवढ्याच भक्तीभावाने जीव ओतून काम केले. अक्षरश: दिवसरात्र एक करत हे काम पूर्ण झाले. श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या अभूतपूर्व सोहळ्यात एका वैदर्भिय कन्येचे हे योगदान वैदर्भियांसाठी देखील अभिमानास्पद आहे.