नागपूर : चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव ट्रक खासगी बसवर धडकली. या अपघातात बसमधील एक महिला जखमी झाली तर १८ प्रवासी थोडक्यात बचावले. ट्रकची धडक एवढी जोरात बसली की बस थेट दुभाजकावर चढली. हा थरार शनिवारी पहाटे साडेपाच वाजता घडला. या प्रकरणी वाडी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
माया धर्मदास राऊत (५८, गोधनी रोड, मानकापूर) असे जखमी महिलेचे नाव आहे. वाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक खासगी बस २० प्रवासी घेऊन नांदेडवरुन नागपुरात येत होती. शनिवारी पहाटेच्या सुमारास रस्ता निर्जन असल्यामुळे खासगी बस भरधाव होती. काटोल बायपास वळणावरुन जात असताना काटोल नाक्याकडून टोल नाक्याकडे भरधाव येणाऱ्या ट्रकने बसला जबर धडक दिली. या धडकेत खासगी बस अक्षरक्ष: काही अंतर घासत गेली. बसमधील महिला माया राऊत यांना गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. बसमधील प्रवासी घाबरले आणि बसबाहेर पडायला लागले. माया राऊत यांच्या डोक्याला, हाताला मार लागला. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर प्रवासी, ट्रकचालक आणि बसचालक थोडक्यात वाचले. वाडीचे पोलीस उपनिरीक्षक सतीश गुलबे हे लगेच पोलिसांच्या ताफ्यासह घटनास्थळावर पोहचले. त्यांनी अपघातग्रस्तांना रुग्णालयात रवाना केले. या प्रकरणी वाडी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा : Video: येता संकट धैर्य, शौर्यासह लढली माझी आई….! पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी वाघापुढे उभे ठाकले अस्वल
मोठी दुर्घटना टळली
खासगी बसला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यानंतर काही मिनिटातच बसमधील प्रवासी पटापट खाली उतरले. काहींनी अन्य प्रवाशांना खाली उतरण्यात मदत केली. ट्रकची धडक डिजल टँकच्या बाजूला लागली. त्यामुळे मोठी हाणी टळली. बसने पेट घेतला असता तर बसमधील प्रवाशाचा जीव धोक्यात होता. पोलिसांनीसुद्धा वेळीच घटनास्थळावर पोहचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. ट्रकचालकाच्या अटकेची सध्या सुरू आहे.
हेही वाचा : “लोकसभेत केलेली चूक विधानसभेत करू नका,” अजित पवारांचे आवाहन
नागपुरात वाढले अपघात
गेल्या काही दिवसांंपासून नागपुरात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रण सोडून वसुलीवर भर देत असल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था बिघडली आहे. अनेक रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली असून वाहनचालक त्रस्त झाले आहेत. अपघात होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस प्रामाणिक प्रयत्न करीत नसल्यामुळेच अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अपघात नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.