नागपूर : शहरात सुरु असलेल्या कारागृह पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत ‘हायटेक कॉपी’चा प्रकार समोर आल्यामुळे राज्यभरातील लेखी परीक्षेच्या पारदर्शकतेवर संशय निर्माण झाला झाला आहे. राज्यात फक्त नागपुरात ‘स्पाय कॅमेऱ्याने कॉपी’ केल्याचा गुन्हा दाखल असून एका उमेदवाराला अटक करण्यात आली तर या प्रकरणातील दुसरा आरोपी अद्यापही फरार आहे. त्याला अटक करण्यासाठी मानकापूर पोलिसांचे पथक छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते. मात्र, आरोपीचा सुगावा न लागल्याने पोलीस पथक रिकाम्या हाताने परतले. मात्र, हा कॉपीचा प्रकार पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे घडल्याची चर्चा आहे. जीवन काकरवाल (वय २९, रघुनाथपूर वाडी, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर) असे फरार आरोपीचे नाव आहे तर किसन जोनवाल (बाभुलगाव, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर) असे अटकेतील उमेदवाराचे नाव आहे.

राज्यभरात पोलीस भरती सुरू असून, सध्या लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेत कुणीही ‘कॉपी’ करू नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी सतर्क होते. मानकापूर येथील क्रीडा संकुलात कारागृह शिपाई पदभरतीसाठी लेखी चाचणी परीक्षा घेतली जात आहे. २९ सप्टेंबरला दुपारी परीक्षेत आरोपी उमेदवार किसन जोनवाल याला पोलिसांनी कॉपी करताना रंगेहाथ अटक केली. तर छत्रपती संभाजीनगरात बसून प्रश्नाची उत्तरे पाठवणारा त्याचा साथीदार जीवन काकरवाल याचे नाव समोर आले होते. त्याला अटक करण्यासाठी मानकापूरच्या ठाणेदार स्मिता जाधव यांनी पथक पाठवले होते. मात्र, पथक रिकाम्या हाताने परत आले. दुसऱ्या आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती ठाणेदार जाधव यांनी दिली.

हेही वाचा : पंतप्रधान १५ दिवसांत दुसऱ्यांदा विदर्भात…बंजारा समाजाची गठ्ठा मतपेढी…

किसन हा परीक्षा केंद्राच्या आत मोबाईल घेऊन पोहोचला होता. त्याने शर्टाच्या आतील खिशात मोबाईल ठेवला होता. तर खांद्याजवळील पट्ट्यावरील आतील खिशात बॅटरी व कॉपर वायर असलेले स्पाय डिव्हाईस ठेवले होते. परीक्षा सुरू असताना त्याने मोबाईलद्वारे तीन क्रमांकांवर फोन केले होते. त्याने जीवनला प्रश्नपत्रिकेचे फोटो मोबाईलच्या माध्यमतून पाठविले होते व दुसरा आरोपी जीवन हा बाहेरून उत्तरे सांगत होता. आरोपीने बराच वेळ पेपर लिहीला होता. त्यानंतर तो पकडल्या गेला.

१२ उमेदवारांसाठी तीन पोलीस

आरोपी किसन याच्या परीक्षा केंद्रावर दुपारी केवळ १२ उमेदवार होते. त्यावेळी एक पोलीस निरीक्षकासह एकूण तीन पोलीस कर्मचारी हजर होते. मात्र त्यांच्या उपस्थितीतदेखील दुसऱ्याच रांगेत बसलेल्या किसनने हायटेक कॉपी केली. त्याने मोबाईलच्या सहाय्याने फोटो पाठवून प्रश्नपत्रिका बाहेर पाठविल्यावरदेखील कुणालाही कळाले नव्हते, ही बाब अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे. त्यामुळे पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे परीक्षा पारदर्शक झाली नसल्याचा आरोप होत आहे.

संभाजीनगरला पोलीस पथक

आमचे पथक छत्रपती संभाजीनगरला गेले होते. पथकाने ठिकठिकाणी छापे घालून आरोपी जीवनचा शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. त्यामुळे पोलीस पथक रिकाम्या हाताने परत आले. फरार आरोपीची लवकरच शोध घेण्यात येईल असे ठाणेदार स्मिता जाधव, यांनी सांगितले